‘किसान अॅप’चे वरातीमागून घोडे; वादळ-वारे येऊन गेल्यानंतर अलर्ट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:46 AM2021-05-25T04:46:44+5:302021-05-25T04:46:44+5:30
वाशिम : आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांना हवामानाची अद्ययावत माहिती, शेतीविषयी मार्गदर्शन प्राप्त व्हावे याकरिता कृषी विभागाने ‘किसान अॅप’ सुरू केले ...
वाशिम : आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांना हवामानाची अद्ययावत माहिती, शेतीविषयी मार्गदर्शन प्राप्त व्हावे याकरिता कृषी विभागाने ‘किसान अॅप’ सुरू केले आहे. त्याचा काही प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होत असला तरी काही दिवसांपासून वादळ-वाऱ्यासंदर्भात अचूक माहिती मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमही निर्माण होत आहे. गत आठवड्यात वादळ-वारे येऊन गेल्यानंतर अलर्ट मिळल्याने फायदा कमी आणि डोकेदुखी जास्त, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.
शेतीला नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देण्याबरोबरच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शासन, प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. ‘किसान अॅप’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, अतिवृष्टी, वातावरणाची माहिती, पीकपाणी, पिकांवरील रोगराई, त्यासाठी नियोजन आदी माहितीचे संदेश दिले जातात. ही माहिती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते; परंतु गेल्या काही दिवसांपासून या अॅपद्वारे दिले जाणारे संदेश दोन- तीन दिवस उशिरा मिळत आहेत. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे, हा संदेश शेतकऱ्यांच्या मोबाईलवर उशिरा आला. सध्याचे तंत्रज्ञानाचे युग असतानाही वेळ संपल्यावर संदेश येत आहेत. त्यामुळे हे अॅप नावापुरतेच तर नाही का? अशी शंकाही शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. वादळ-वारे येऊन गेल्यानंतर अलर्ट मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी फायदा कमी डोकेदुखी जास्त बनले आहे.
०००
किसान अॅपवर काय मिळते माहिती?
अॅपवरून शेतकऱ्यांना कृषी हवामानविषयक माहिती मोबाईलवर पाठवून उपयुक्त सल्ले देण्यात येतात.
जिल्हा परिसरातील कृषी निविष्ठा व्यापारी, विक्री केंद्र यांची माहिती देण्यात येते.
जिल्ह्यातील सर्व बाजार समितींचे बाजारभाव देण्यात येतात. त्यामुळे शेतमालाचे भाव माहिती करणे सोयीस्कर होते.
पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास पीक संरक्षण व तज्ज्ञ सल्ला याबाबत माहिती देण्यात येते.
००००
अपडेट वेळेत मिळावे...
हवामान, वातावरणात होणारे बदलाचे अपडेट वेळेत मिळावेत, त्यामुळे शेतीचे नियोजन करण्यात सोयीस्कर होईल.
बाजारभाव दररोज अपडेट झाल्यास माल विक्रीसाठी नेता येईल, शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही.
पीक संरक्षण सल्ला वारंवार अपडेट करावा, जेणेकरून बंदी असलेली कीटकनाशके कळतील.
००००००
इशारा मिळाला, पण वादळ येऊन गेल्यानंतर!
किसान अॅप शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे; परंतु अलीकडच्या काळात हवामानविषयक माहिती वेळेवर मिळत नसल्याचे दिसून येते. हवामान बदलानुसार शेतकरी हे शेती मशागत, पीक पेरणी व अन्य कामे करीत असतात. त्यामुळे अचूकता असणे आवश्यक आहे.
- गौतम भगत, शेतकरी.
००००००
किसान ॲपच्या माध्यमातून मिळणारे संदेश शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. हवामान बदलात सतर्कता महत्त्वाची आहे. वेळोवेळी वातावरणाचे संदेश मिळाल्यास पिकांची निगा राखण्यास फायदेशीर ठरते; परंतु गेल्या काही दिवसांपासून माहिती अपडेट करण्यात येत नसल्याचे दिसते.
- महादेव सोळंके, शेतकरी.
००००००
खरीप हंगामाचे दिवस जवळ येत असल्याने शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती वेळेवर मिळणे गरजेचे आहे. किसान अॅपवरून इतर उपयुक्त माहिती मिळत आहे. हवामानविषयक माहिती वेळेवर मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
- गौरव सरनाईक, शेतकरी.
०००००
सुधारणा करता येतील..
किसान अॅप हे शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. हवामानाची माहितीदेखील अचूक मिळते. काही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असेल तर तो दूर करता येईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.