फळबाग योजनेला तिलांजली
By admin | Published: November 4, 2015 03:03 AM2015-11-04T03:03:28+5:302015-11-04T03:03:28+5:30
मानोरा तालुक्यात शेकडो हेक्टरचे प्रस्ताव धूळ खात!
जगदीश राठोड / मानोरा (जि. वाशिम) : शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावा यासाठी शासनातर्फे कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात आहेत; परंतु प्रत्यक्षात शेतकर्यांना त्याचा लाभ मिळत नाही. अधिकार्यांना योजना राबविण्यासाठी स्वारस्य नसल्याने मूळ उद्देशाला मूठमाती मिळत आहे. मानोरा तालुक्यात फळबाग योजनेची हीच परिस्थिती आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शेकडो हेक्टरचे प्रस्ताव धूळ खात संबंधितांकडे पडून आहे. कृषी विभागाकडून अल्पभूधारक शेतकर्यांसाठी फळबाग योजना राबविली जात आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभासाठी अनेक अर्ज दाखल झालेले आहेत. सुरुवातीला कृषी विभाग, त्यानंतर तसहील प्रशासनाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले जातात; परंतु तत्काळ, तर दूर कित्येक वर्षापर्यंंत प्रस्तावावरची धूळ झटकली जात नाही आणि चुकून प्रस्तावांच्या फाइलला हात लागला तरी विविध प्रकारच्या त्रुट्या काढून संबंधिताना वारंवार चकरा मारण्यास भाग पाडले जाते. प्रत्यक्षात कृषी विभागानेच त्रुटीची पूर्तत: करून फाइल तहसील कार्यालयाकडे पाठविण्याचे अपेक्षा आहे; परंतु त्यांनाही या विषयात स्वारस्य नाही. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणार्या अनेक लोकाच्या फायली मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यानच्या काळात काही लोकांना कृषी विभागाने पुळझाडे लावण्यासाठी शेतजमिनीवर खड्डे खोदून ठेवण्याचा सल्ला दिला आशेपोटी शेतकर्यांनीही प्रक्रिया पूर्ण केली; परंतु फळझाडासाठीच्या प्रस्तावाला मंजुरीच दिली नाही. यात शेतकर्यांचा पैसा व्यर्थ गेला. तहसील आणि कृषी विभागामध्ये समन्वय नसल्याने शेतकर्यांची गळचेपी सुरू आहे. सदर योजनाच फसवी असल्याच्या प्रतिक्रिया शेतकर्यांमधून व्यक्त होत आहे. कोरडवाहू शेती बेभरवशी झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांचा ओलीत करून विविध प्रकारचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न आहे. तरीही तहसील विभाग केवळ प्रस्ताव मंजूर करण्यातही चालढकल करत आहे.