रुग्णालयानेच कोरोना रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:39 AM2021-04-15T04:39:36+5:302021-04-15T04:39:36+5:30
वाशिम : कोरोना रुग्णाच्या नातेवाइकांची गैरसोय होऊ नये म्हणून यापुढे संबंधित कोविड रुग्णालयानेच रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन व औषधे उपलब्ध ...
वाशिम : कोरोना रुग्णाच्या नातेवाइकांची गैरसोय होऊ नये म्हणून यापुढे संबंधित कोविड रुग्णालयानेच रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन व औषधे उपलब्ध करून द्यावीत, असा आदेश वाशिम जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. यामुळे औषधे व इंजेक्शनसाठी नातेवाइकांची होणारी गैरसोय टळेल, असा आशावाद व्यक्त होत आहे.
रेमडेसिविर इंजेक्शन व अन्य औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याने मध्यंतरी वाशिम जिल्ह्यात रुग्णांच्या नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागला. यासंदर्भात नातेवाइकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाशिम जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र आदेश काढत रुग्णालयांनी स्वत: कोविड रुग्णांना इंजेक्शन व औषधे उपलब्ध करून द्यावीत, रुग्णांच्या नातेवाइकास बाहेरून इंजेक्शन घेऊन येण्यास सांगू नये तसेच किमतीसंदर्भात लूट होऊ नये म्हणून आकारलेली किंमत याचा लेखाजोखा ठेवण्याचे निर्देश दिले. कोविड रुग्णालयांनी रुग्णांना औषधे व इंजेक्शनची किंमत ही शासनमान्य दरानेच आकारावी, तफावत आढळून आल्यास नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. संबंधित कोविड रुग्णालयाने रेमडेसिविर इंजेक्शनची किंमत जादा आकारली तर नातेवाइकांना आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासनाकडे तक्रारही नोंदविता येणार आहे. या तक्रारीनुसार पडताळणीअंती दोषी आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.