रुग्णालयांत जागा नाही; कोविड केअर सेंटरमध्ये बेड रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:40 AM2021-04-18T04:40:52+5:302021-04-18T04:40:52+5:30
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आणि गंभीर रुग्णांना उपचार आवश्यक असल्याने ते खासगी रुग्णालयांकडे धाव घेत ...
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आणि गंभीर रुग्णांना उपचार आवश्यक असल्याने ते खासगी रुग्णालयांकडे धाव घेत आहेत. खासगी रुग्णालयात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडसाठी कसरत करावी लागते, तर दुसरीकडे कोविड केअर सेंटरमध्ये मात्र ६५७ बेड रिक्त आहेत.
वाशिम जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. सक्रिय रुग्णसंख्या सव्वा तीन हजारांवर गेली आहे. दैनंदिन दीड हजारावर चाचण्या होत असून, सरासरी ३५० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. मध्यम व गंभीर लक्षणे असलेले रुग्ण शक्यतोवर खासगी हॉस्पिटलला प्राधान्य देत असल्याने रुग्णालयांत ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडसाठी कसरत करावी लागते. कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड नसल्याने तेथे मात्र जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीनुसार ६५७ बेड रिक्त आहेत.
००
कोविड केअरमध्ये ५० टक्के बेड रिकामे
जिल्ह्यात एकूण १० कोविड केअर सेंटर आहे. यामध्ये एकूण १०७१ बेड आहेत. जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीनुसार सध्या ६५७ बेड रिक्त आहेत.
०००
सौम्य लक्षणे असलेले रुग्ण कोविड सेंटरमध्ये
कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला; परंतु लक्षणे सौम्य आहेत, अशा रुग्णाला थेट गृहविलगीकरणाचा पर्याय न देता एक, दोन दिवस कोविड केअर सेंटरला पाठविले जाते. त्यानंतर तहसीलदारांच्या परवानगीने गृह विलगीकरणाला हिरवी झेंडी दिली जाते.
०००
रुग्णांसाठी बेड मिळविण्यासाठी नातेवाइकांची वणवण
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असल्याने मध्यम व गंभीर स्वरूपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड मिळविताना रुग्णांसह नातेवाइकांची दमछाक होत आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड मिळणे कठीण झाले आहे.
०००
कोविडग्रस्तांवर उपचार करणारे एकूण रुग्णालये
- ०९
००००
सामान्य बेड..
एकूण बेड ९२
रिकामे बेड ७१
एकूण ऑक्सिजन बेड ५०९
रिकामे ऑक्सिजन बेड ६४
०००००
कोविड केअर सेंटर - १०
एकूण बेड १०७१
रिकामे बेड ६५७