शेतकरी हवालदिल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:28 AM2017-09-07T01:28:36+5:302017-09-07T01:28:56+5:30

शेतातील सोयाबीनचे बियाणे न उगविल्यासंदर्भात त्रिस्तरीय समितीने दोन महिन्यांपूर्वी पाठविलेल्या अहवालावर महाबीजने अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. दुसरीकडे आता सोयाबीनला शेंगाच धरल्या नसल्याने कृषी विभागाने पाहणी करून शासनाकडे अहवाल सादर करावा, या मागणीसाठी शेकडो शेतकर्‍यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे येत आहेत.

Hovering the farmer! | शेतकरी हवालदिल !

शेतकरी हवालदिल !

Next
ठळक मुद्देबियाण्यासंदर्भात महाबीजचा अहवाल अप्राप्त नापिकीबाबत तक्रारींचा ओघ

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शेतातील सोयाबीनचे बियाणे न उगविल्यासंदर्भात त्रिस्तरीय समितीने दोन महिन्यांपूर्वी पाठविलेल्या अहवालावर महाबीजने अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. दुसरीकडे आता सोयाबीनला शेंगाच धरल्या नसल्याने कृषी विभागाने पाहणी करून शासनाकडे अहवाल सादर करावा, या मागणीसाठी शेकडो शेतकर्‍यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे येत आहेत.
यावर्षी पेरणीच्या हंगामात मानोरा तालुक्यातील जवळपास ४00 एकरांवरील महाबीजचे सोयाबीन बियाणे उगविले नसल्याची तक्रार शेतकर्‍यांनी तालुका व जिल्हा कृषी विभागाकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने २८ जून रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सदस्य सचिन पाटील रोकडे यांनी आवाज उठविला होता. त्रिसदस्यीय समितीद्वारे घटनास्थळाला भेट पाहणी अहवाल तयार करण्याची मागणी लावून धरली होती. याची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश कृषी विकास अधिकारी नरेंद्र बारापत्रे यांना दिले होते. तातडीने त्रिसदस्यीय समिती नेमून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता खूपच कमी असल्याचे या पाहणीत स्पष्ट झाले. यासंदर्भातील अहवाल कृषी विभागाच्यावतीने महाबीजच्या विभागीय व्यवस्थापकांकडे जुलै महिन्यात पाठविण्यात आला. जुलै व ऑगस्ट असा दोन महिन्यांचा कालावधी लोटला; मात्र अद्याप महाबीजने हा अहवालावर उत्तर दिले नाही किंवा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी पत्रव्यवहारदेखील केला नाही, असे कृषी विकास अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. या अहवालावर शेतकर्‍यांना मिळणारी नुकसान भरपाई अवलंबून आहे. बियाणे उगवले नसल्याने जवळपास १00 शेतकर्‍यांना जबर फटका बसला आहे. मंगरूळपीर, रिसोड, मालेगाव तालुक्यातील बियाणे उगविले नसल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी होत्या. याचा अहवालदेखील अप्राप्त आहे. आता नापिकी असल्याने प्रशासनाने सर्व्हे करून शासनाकडे अहवाल सादर करावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. 

भेसळयुक्त बियाण्यांवरही कार्यवाही नाही 
मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील गोविंदा मोतीराम भगत यांच्या शेतात महाबीजचे बियाणे भेसळयुक्त असल्याचा प्रकार जुलै महिन्यात उघडकीस आला होता. याप्रकरणी ‘लोकमत’ने २५ जुलैच्या अंकात ‘पेरले एक, उगवले दुसरेच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून कृषी विभागाचे लक्ष वेधले होते. याची दखल कृषी विभागाने १ ऑगस्ट रोजी संबंधित शेतकर्‍यांच्या शेताला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतात अन्य प्रकारचे ७0 टक्के बियाणे असल्याचे कृषी विभागाच्या चमूला आढळून आले होते. नुकसान भरपाई मिळण्याची मागणी गोविंदा भगत यांनी केलेली आहे. अद्याप यावर कुठलीच कार्यवाही नाही.

पंचनामे करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक
पावसात सातत्य नसल्याने व गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आता हलक्या जमिनीवरील सोयाबीन पीक हातचे गेले आहे, तर दज्रेदार जमिनीवरील सोयाबीन धोक्याच्या पातळीवर आहे. कारंजा, मानोरा, रिसोड, मंगरूळपीर तालुक्यातील शेकडो एकरावरील सोयाबीनला शेंगाच धरल्या नसल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे केल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभागातर्फे पाहणी केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने पाहणी करून अहवाल शासनाकडे सादर करावा, अशी मागणी माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमेंद्र ठाकरे यांच्यासह शेतकर्‍यांनी बुधवारी केली.
-

Web Title: Hovering the farmer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.