सीईटी रद्द झाल्याने अकरावी प्रवेश होणार कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:47 AM2021-08-13T04:47:16+5:302021-08-13T04:47:16+5:30
अकरावीसाठी २२ हजार जागा : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा वाशिम : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) ...
अकरावीसाठी २२ हजार जागा : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा
वाशिम : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) न्यायालयाने रद्द केल्याने अकरावी प्रवेश कसे होणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. निकालाची टक्केवारी वाढल्याने दहावीच्या गुणांवरच अकरावीचे प्रवेश देणे कसरतीचे ठरणार असल्याचे मानले जात आहे.
यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली असून, मूल्यमापनाच्या आधारे जिल्ह्यातील १९,१९१ पैकी १९,१८८ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण घोषित करण्यात आले. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत अकरावीतील प्रवेशित जागा अधिक असल्याने दहावी उत्तीर्ण सर्वांनाच अकरावीत प्रवेश मिळणार आहेत. मनासारख्या कॉलेजला प्रवेश मिळावा, याकरिता सीईटी परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु उच्च न्यायालयाने ही परीक्षा रद्द केली आहे. अकरावीचे प्रवेश नेमके कसे होणार, याबाबत शासनाकडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना अद्याप शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात अकरावीसाठी २२८५० जागा उपलब्ध आहेत. मनासारखे कॉलेज मिळविताना विद्यार्थ्यांची कसरत होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
००००००००००००००००
विद्यार्थी स्थिती...
दहावी पास विद्यार्थी १९,१८८
अकरावीची प्रवेश क्षमता २२८५०
शाखानिहाय जागा
कला ११४००
वाणिज्य ६५०
विज्ञान १०८००
००००००००००००००००
आता प्रतीक्षा राज्य सरकारच्या निर्देशांची
कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रालाही फटका बसला. दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या. अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार होती; परंतु न्यायालयाने ही परीक्षा रद्द केल्याने आता गुणानुक्रमानुसार प्रवेश प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. शासनाकडून अद्याप कोणत्याही मार्गदर्शक सूचना आल्या नाहीत.
- मंगेश धानोरकर,
प्राचार्य
०००००
न्यायालयाने अकरावी प्रवेशासाठी होणारी सीईटी रद्द केल्याने आणि अजून शासनाकडून मार्गदर्शक सूचना नसल्याने विद्यार्थीदेखील गोंधळात पडले आहेत. दहावीच्या बहुतांश विद्यार्थ्यांना गुणही चांगले मिळाले आहेत. गुणानुक्रमे आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, यानुसार प्रवेश होणे अपेक्षित आहे.
- बाळासाहेब गोटे, प्राचार्य.
००००
विद्यार्थी चिंतित...
कोरोनामुळे यंदाही परीक्षा व प्रवेश याबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती होती. आताही सीईटी रद्द झाल्याने प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी होणार? केव्हापासून सुरू होणार? याबाबत काही निश्चितता नाही. मार्गदर्शक सूचना लवकर यायला हव्या.
- पंकज देशमुख
विद्यार्थी
....
न्यायालयीन निर्णयानुसार सीईटी परीक्षा रद्द झाल्याने आता अकरावीचे प्रवेश केव्हा आणि कसे होणार, याबाबतही शासनाने लवकर निर्णय घेणे विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर मार्गदर्शक सूचना आल्या तर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश लवकर घेता येईल.
- धीरज काबरा
विद्यार्थी
०००००००००००००
महाविद्यालयांचा कटऑफ वाढणार!
यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली. अंतर्गत मूल्यमापनानुसार विद्यार्थ्यांचा निकाल घोषित करण्यात आला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी तसेच ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी यंदा वाढली आहे. त्यामुळे महाविद्यालयांचा कटऑफही वाढण्याची दाट शक्यता आहे. गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश झाले तर ९० टक्क्यापेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्याला पसंतीचे कॉलेज मिळविताना कसरत होण्याची शक्यता आहे.
०००००००००००००००००