‘एचआरसीटी स्कोर’ २४, ऑक्सिजन पातळी ५०; रामेश्वरची कोरोनावर यशस्वी मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 06:44 PM2021-06-20T18:44:02+5:302021-06-20T18:44:11+5:30
Corona Virus Positive News : रामेश्वर चव्हाण या ३३ वर्षीय युवकाला कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले तेव्हा त्याचा एचआरसीटी स्कोर २४ इतका होता.
वाशिम : ‘एचआरसीटी स्कोर’ २४, ऑक्सिजनची पातळी (एसपीओटू) ५० असलेल्या रामेश्वर राधाकिसन चव्हाण रा. पारवा (ता. मानोरा) या युवकाने आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि जिल्हा शासकीय कोविड रुग्णालयामधील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे कोरोनावर यशस्वी मात केली आहे. एका महिन्यांनंतर त्याला १९ जून रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कोविड रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून रामेश्वरला कोरोनामुक्त केल्याबद्दल त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले.
पारवा येथील रामेश्वर चव्हाण या ३३ वर्षीय युवकाला कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले तेव्हा त्याचा एचआरसीटी स्कोर २४ इतका होता. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी प्रयत्न सुरु केले. मात्र, वाशिमसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये प्रयत्न करूनही बेड उपलब्ध न झाल्याने त्यांनी रामेश्वरला १५ मे २०२१ रोजी वाशिम जिल्हा स्त्री रुग्णालय येथील जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्याच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी (एसपीओटू) सुमारे ५० च्या आसपास होती. कोविड रुग्णालयात दाखल झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. राम हजारे यांच्या चमूने रामेश्वरवर उपचार सुरु केले. त्याला सुरुवातीला हायफ्लो ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. मात्र, त्याची तब्येत खालावल्याने व्हेंटीलेटरच्या सहाय्याने त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. जवळपास १५ दिवस त्याच्यावर व्हेंटीलेटरच्या सहाय्याने उपचार सुरु होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हजारे यांच्या चमूने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे रामेश्वरचा कोरोना चाचणी अहवाल ३० मे रोजी ‘निगेटिव्ह’ आला. तो कोरोनामुक्त झाला, मात्र रुग्णालयात दाखल होण्यास विलंब झाल्याने फुफ्फुसामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होवून त्याच्या फुफ्फुसाची हानी झाली होती. त्यामुळे कोरोनामुक्त होवूनही त्याच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढण्याची गती कमी होती. डॉक्टरांनी कृत्रिम ऑक्सिजनच्या सहाय्याने उपचार केल्याने त्याच्या रक्तातील ऑक्सिजन पातळी हळूहळू ९२ पर्यंत वाढण्यास मदत झाली. त्यानंतर त्याला १९ जून रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.