बारावीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन मिळणार परीक्षेचे प्रवेशपत्र !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 05:34 PM2019-01-22T17:34:10+5:302019-01-22T17:34:29+5:30
वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळांच्या ‘लॉग-इन’वर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र (हॉल तिकिट) आॅनलाईन पद्धतीने मोफत मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळांच्या ‘लॉग-इन’वर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र (हॉल तिकिट) आॅनलाईन पद्धतीने मोफत मिळणार आहे. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शाळांची संपर्क साधावा, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे यांनी केले आहे.
इयत्ता बारावीची वार्षिक परीक्षा फेब्रुवारी, मार्च २०१९ मध्ये असून, विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने मोफत प्रवेशपत्र मिळण्याची सुविधा शाळा स्तरावरच १८ जानेवारीपासून उपलब्ध करण्यात आली आहे. शाळेच्या लॉग-इन मधून सदर परीक्षा प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना डाऊनलोड करून त्याची प्रत घ्यावी लागणार आहे. या प्रवेशपत्रावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांचा सही व शिक्का आवश्यक राहणार आहे. प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असेल तर उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने विभागीय मंडळात जाऊन दुरूस्ती करावी लागणार आहे. प्रवेशपत्रावरील छायाचित्र, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरूस्त्या उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवावी लागणार आहे. सदर प्रवेशपत्र गहाळ झाल्यास संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाने संबंधित विद्यार्थ्यास पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल रंगाने ‘द्वितीय प्रत’ असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यावे लागणार आहे. फेब्रुवारी, मार्च २०१९ मध्ये इयत्ता बारावीच्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयातून आॅनलाईन पद्धतीने प्रवेशपत्राची मोफत प्रिंट काढून घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी नरळे यांनी केले.