मालेगाव येथे वादळी वाऱ्याने घरांचे प्रचंड नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:29 AM2021-05-31T04:29:31+5:302021-05-31T04:29:31+5:30
मालेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळी वातावरण कायम आहे. अधून-मधून सोसाट्याचा वाराही सुटत आहे. अशात २९ मे रोजी सायंकाळच्या ...
मालेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळी वातावरण कायम आहे. अधून-मधून सोसाट्याचा वाराही सुटत आहे. अशात २९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास आकाशात मेघ दाटून येत विजांचा कडकडाट सुरू झाला. वादळी वाऱ्यासह सुमारे अर्धा तास धुवाधार पाऊस झाला. वाऱ्याचा वेग प्रचंड प्रमाणात असल्याने अनेकांच्या घरांवरील टिनपत्रे उडून झाडांवर, विद्युत खांबांवर जाऊन अडकली. परिसरातील अनेक मोठी झाडे वादळी वाऱ्याने उन्मळून पडली. अचानक ओढावलेल्या या नैसर्गिक संकटामुळे अधिकांश गोरगरिबांच्या घरांवरील उडालेली टिनपत्रे त्यांना कुठेच सापडली नाहीत. त्यामुळे ऐन कोरोनाच्या संकटकाळात हाताला कुठलेही काम नसताना घरावर नवीन टिनपत्रे कसे टाकणार, असा प्रश्न त्यांच्यासमक्ष उभा ठाकला आहे.
....................
तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित
वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांवरील टिनपत्रे उडून थेट विद्युत खांब व तारांवर जाऊन अडकले. यामुळे काही ठिकाणच्या विद्युत प्रवाहित तारा तुटून पडल्या यामुळे बराचवेळ विद्युत पुरवठा खंडित राहिला. ‘महावितरण’ची यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली असून ३० मे रोजी दुरूस्तीची कामे सुरू असल्याचे पाहावयास मिळाले.
...............
आधीच उत्पन्नात घट; त्यात भिजला भुईमूग
मालेगाव तालुक्यात सध्या भुईमूग काढून घेण्याच्या कामास वेग आला आहे. २९ मे रोजी काही शेतांमध्ये हे काम सुरू असतानाच वादळी वारा सुटून जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे अनेकांचा भुईमूग भिजून नुकसान झाले. भुईमुगास कडक उन्ह देण्याची गरज भासत आहे; मात्र ३० मे रोजीदेखील ढगाळी वातावरण कायम राहिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.