निराधार मूकबधिराना शिक्षणाबरोबर दिली मायेची उब; कोकाटे दाम्पत्यांचा अनोखा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 02:46 PM2018-03-31T14:46:01+5:302018-03-31T14:47:58+5:30
रिसोड : रिसोड तालुक्यातील मोरगव्हाण येथिल डॉ. प्रल्हाद कोकाटे व त्यांची पत्नी त्रिवेणी कोकाटे यांनी परिसरातील मूकबधिर व आई वडिलांचे छत्र हरविलेल्या निराधार मुलांना दर्जेदार शिक्षणसोबतच मायेची उब देण्याचे उपक्रम हाती घेतला आहे.
- शीतल धांडे
रिसोड : रिसोड तालुक्यातील मोरगव्हाण येथिल डॉ. प्रल्हाद कोकाटे व त्यांची पत्नी त्रिवेणी कोकाटे यांनी परिसरातील मूकबधिर व आई वडिलांचे छत्र हरविलेल्या निराधार मुलांना दर्जेदार शिक्षणसोबतच मायेची उब देण्याचे उपक्रम हाती घेतला आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी नोकरी सोडून या कार्यामध्ये स्व:ताला झोकून दिले आहे. हे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी व सर्व मानव समाजासाठी जगण्याची तळमळ अधोरेखित करणारे ठरत आहे.
रिसोड तालुक्यातील मोरगव्हान या छोट्या गावात जन्म घेतलेल्या डॉ. प्रल्हाद कोकाटे यांनी माऊली स्वयंसेवी संस्था या संस्थेची स्थापना सन २००० साली करून या संस्थेच्या माध्यमातून श्री. संत गजानन महाराज निवासी मूकबधिर विद्यालय सुरू केले. निराधार, अपंग मुलांना शिक्षणबरोबर सर्व भौतिक सोयी, सुविधा येथे उपलब्ध करुन दिल्यात. या शाळेत आजमितीस चाळीस मूकबधिर मुले शिक्षण घेत आहेत. यातील बहुतांश मुले निराधार व ऊस तोड कामगारची आहेत. समाजामधील मुकबधीर मुलांचा शोध घेत अशा सर्व मुलांना कोकाटे यांनी शाळेत प्रवेश देवून आई,वडिलांचे प्रेम दिले. उन्हाळ्याच्या सुट्टीत ही मुले कोकाटे दाम्पत्यांच्या घरी राहतात. आतापर्यंत झालेल्या सर्व क्रिडा स्पर्धा मध्यें या मुलांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत बहुतांश बक्षिसे प्राप्त केली आहेत हे विशेष. या मुलांना शाळेत व्यायाम, शैक्षणिक साहित्य व आवश्यक सर्व वस्तू पुरविल्या जातात , सोबतच विविध प्रशिक्षण तज्ञांकडून दिल्या जात आहेत. या उपक्रमाची दखल घेत परिसरातील अनेक मान्यवर आपल्या मुलांचे वाढदिवस, पूर्वजांचे वर्षश्राद्ध सारखे कार्यक्रम मुलांच्या सान्निध्यात मोठया उत्साहाने साजरे करुन त्यांना मदतीचा हात पुढे करतात. या दाम्पत्यांनी या कायार्साठी स्वत:ची नोकरी सोडून या शाळेची उभारणी केली आहे.या विधायक कार्यामध्ये कोकाटे परिवारातील सर्व सदस्य त्यांना मदत करत असतात. मुलांच्या दैनंदिन दिनचर्येत त्रिवेणी कोकाटे ह्या आईप्रमाणेच मुलांच्या सकाळच्या आंघोळी पासून तर रात्री झोपेपर्यंत त्यांच्या गरजेनुसार सर्वपरी काळजी घेतात. भविष्यात या मुलांना स्वत:च्या पायावर उभे करून त्यांना स्वालंबी बनविण्यापर्यंतची जबाबदारी कोकाटे दाम्पत्यांच्या संस्थेने स्वीकारली आहे.
आमच्या शाळेत शिक्षण घेणारे निराधार मूकबधिर मुले यांची सेवा करणे हे आमच्यासाठी खूप आनंद देणारे व प्रेरणादायी काम आहे. या मुलांच्या सानिध्यात राहून त्यांचे आयुष्य सुखकर करणे व त्यांच्या जीवनात वेगळी दिशा देण्याचे कार्य हेच आमचे ध्येय आहे. आतापर्यंत शाळेला अनेक लोकप्रतिनिधींनी भेटी देऊन शाळेचे कौतुक केले आहे
- डॉ प्रल्हाद एल कोकाटे, अध्यक्ष
मूकबधिर शाळेमधील मुलांसाठी मला आईची भूमिका निभवावी लागते व त्या मुलांना खाऊ, पिऊ घातल्याचा नंतर त्यांच्या चेहºयावरील हास्यामुळे माझ्या मनाला खूप मोठे समाधान प्राप्त होते.
- त्रिवेणी कोकाटे, संचालक