मालेगाव तालुक्यातील शेकडो लाभार्थी ‘अंत्योदय’च्या लाभापासून वंचित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 03:37 PM2019-01-22T15:37:09+5:302019-01-22T15:37:14+5:30
मालेगाव (वाशिम) : १७ जुलै २०१३ च्या शासन निर्णयातील निकषांप्रमाणे दिव्यांगांसह अन्य घटकातील पात्र लाभार्थ्यांना ‘अंत्योदय’ योजनेचा लाभ मिळायला हवा. मात्र, मालेगाव तालुक्यात शेकडो लाभार्थी यापासून वंचित असून अंत्योदय शिधापत्रिकांचे वाटप अगदीच नगण्य आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : १७ जुलै २०१३ च्या शासन निर्णयातील निकषांप्रमाणे दिव्यांगांसह अन्य घटकातील पात्र लाभार्थ्यांना ‘अंत्योदय’ योजनेचा लाभ मिळायला हवा. मात्र, मालेगाव तालुक्यात शेकडो लाभार्थी यापासून वंचित असून अंत्योदय शिधापत्रिकांचे वाटप अगदीच नगण्य आहे. दरम्यान, हा प्रश्न तत्काळ निकाली काढून संबंधित पात्र लाभार्थ्यांना ‘अंत्योदय’चा लाभ द्यावा; अन्यथा ५ फेब्रुवारीला तहसील कार्यालयावर ‘डफडे बजाओ’ आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रीय अपंग विकास महासंघाने तहसीलदारांकडे सोमवारी सादर केलेल्या निवेदनात दिला आहे.
निवेदनात पुढे नमूद आहे, की आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाºया नागरिकांना अल्प दरात धान्य मिळावे, यासाठी शासनाने १७ जुलै २०१३ रोजी अंत्योदय योजनेचा शासन निर्णय पारीत केला. त्यातील निकषांप्रमाणे दिव्यांगांसह विधवा, परितक्त्या, हमाल, मजूर, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, गारुडी, आदिवासी, ग्रामीण कारागीर, एड्सग्रस्त, मालवाहक, सायकलरिक्षा चालक, कुंभार, चांभार, फळ आणि फुल विक्रेते, विणकर, सुतार, मोची, कचºयातील वस्तु गोळा करणारे, कुष्ठरोगी आदिंना अंत्योदय शिधापत्रिका वाटप करून योजनेचा लाभ देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, तहसील कार्यालयाकडून त्याची चोखपणे अंमलबजावणी होत नसल्याने अनेक लाभार्थी योजनेपासून वंचित राहत आहेत. त्यानुषंगाने राष्ट्रीय अपंग विकास महासंघाने मालेगाव तालुक्यातील २०० ते २५० लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेवून तहसीलकडे सुपूर्द केले. संबंधितांना तत्काळ लाभ देण्यात यावा; अन्यथा ५ फेब्रुवारीला आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.