सततच्या पावसाने शेकडो हेक्टर जमिन खरडली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 02:32 PM2019-09-27T14:32:51+5:302019-09-27T14:33:19+5:30
परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिक खराब होते की काय या चिंतेत शेतकरी आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : २५ व २६ सप्टेंबर रोजीच्या परतीच्या पावसामुळे मारसूळ, इंझोरी, मोहरी यासह मानोरा तालुक्यातील नदीकाठच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. इंझोरी परिसरात नदीकाठची शेतजमिन पिकांसह खरडून गेली.
इंझोरी : २५ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजतादरम्यान इंझोरी परिसरात परतीचा जोरदार पाऊस झाला. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारासदेखील जोरदार पाऊस झाल्याने इंझोरी परिसरातील नदी, नाले वाहते झाले. पूर आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. सुनिता राठोड, बाळू राठोड, मधु काळेकर, देवानंद हळदे, मंगेश काळेकर, मधुकर हळदे, गजानन राठोड, भीमराव राठोड, कुंदन श्यामसुंदर, शमीन शहा, रूख्मिना पुंड, गणेश ढोरे, आनंद तोतला, युवराज वाघमारे, धनराज वाघमारे, पंजाब वाघमारे यांच्यासह २० ते २५ शेतकऱ्यांच्या जमिनी पिकांसह खरडून गेल्या तर अन्य शेतकºयांच्या शेतातील पिकांत पाणी साचले. विमा कंपनी व महसूल प्रशासनाने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
मोहरी : २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजतादरम्यान तसेच २६ सप्टेंबरलादेखील जोरदार पाऊस झाला. या पावसाने उडीद, सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. दुसरीकडे मोहरी परिसरातील नदी नाले व मोहरी येथील धरण पुर्ण भरले आहे. परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिक खराब होते की काय या चिंतेत शेतकरी आहेत.
मालेगाव : २६ सप्टेंबर रोजी परतीच्या पावसाने शेतकºयांची तारांबळ उडाली. सध्या सोयाबीन काढणीला आले आहे. या सुमारास परतीचा पाऊस सुद्धा बरसत आहे. त्यामुळे तालुक्यातील काही भागात मुख्यत्वेकरून मारसुळ भागात शेंगाचे टरफल काळे पडून शेंगातून कोंब बाहेर पडत आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. तालुक्यात ३५ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. परतीच्या पावसाने आता चांगलाच जोर धरला आहे. सोयाबीन पीक काढणीला आले असताना गत तीन, चार दिवसांपासून पडणाºया पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा काळा पडत असून त्याला काही ठिकाणी कोंब बाहेर येत आहे. पावसामुळे सात एकरातील सोयाबीनच्या शेंगामधून कोंब बाहेर येत आहेत, असे मारसूळ येथील शेतकरी श्यामराव घुगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शेतकºयांनी हवामानाचा अंदाज घेऊन तसेच आपल्या जमिनीचा अभ्यास करून पाणी शेतात असेल तर ते पाणी शेताच्या बाहेर काढून द्यावे. त्यामुळे सोयाबीनला कोंब येणार नाहीत. परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याची तक्रार असल्यास पंचनामे केले जातील.
-शशिकिरण जांभरूनकर,
तालुका कृषी अधिकारी मालेगाव