शेकडो नागरिकांची नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात धडक
By नंदकिशोर नारे | Published: September 12, 2023 01:14 PM2023-09-12T13:14:32+5:302023-09-12T13:15:26+5:30
चामुंडा देवी मंदिर परिसरातील समस्यांसाठी नागरिक आक्रमक
वाशिम : शहरातील प्रभाग १५ अ आणि ब मध्ये येणाऱ्या चामुंडा देवी मंदिर परिसरातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. वारंवार नगर परिषद प्रशासनाला विनंती करूनही दखल घेतली जात नसल्याने संतापलेल्या शेकडो नागरिकांनी नगर परिषद कार्यालयात धडक देऊन विविध मागण्यांची तक्रार मुख्याधिकारी यांना दिली. यावेळी जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत येथेच ठिय्या देण्याचा पवित्रा घेतल्यानंतर मुख्याधिकारी यांनी तात्काळ समस्या मार्गी लावण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्या परिसरात रवाना केले.
चामुंडा देवी मंदिर परिसर ही शहरातील खूप जुनी वस्ती आहे. गोरगरीब मजूरदार नागरिकांचे वास्तव्य येथे जास्त आहे. त्यामुळे नगरपालिकेने त्या भागाकडे कायमचं दुर्लक्ष केले आहे. मूलभूत सुविधांपासूनही येथील नागरिक वंचित आहेत. या भागातील विद्युत खांबांवरील पथदिवे नेहमीच बंद असतात. भूमिगत गटार योजना या भागात फिरकलीच नाही. येथील रस्ते ही अरुंद असून नाल्या व्यवस्थित नाहीत. या भागात हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लिम कब्रस्तान आहेत मात्र तेथे जाण्यास रस्ताच नाही आणि ते गटारगंगेत रूपांतरित झाले आहे.
तसेच स्मशानभूमीला लागून सार्वजनिक शौचालयांच्या दोन इमारती आहेत. मात्र, येथे पाणी नाही, सफाई होत नाही, लाईट नाही त्यामुळे या शोभेची वास्तू बनल्या आहेत.यावेळी राजूभाऊ काळे ,दगडू खवणे, बबलू शर्मा, अविनाश वाळेकर, पृथ्वीक गव्हाणकर, रामेश्वर रोही, संतोष इंगोले, लक्ष्मण चोपडे, आकाश राऊत, आकाश खवणे, छोटू शर्मा, रामभाऊ गाडेकर, प्रकाश रत्नपारखी, दत्तात्रय वानखेडे, बालाजी वानखेडे, ऋषिकेश गव्हाणकर, ज्ञानेश्वर काळे, अंबादास वानखेडे, अमोल पवार, माजी सैनिक संतोष मोरे आदिंची उपस्थिती हाेती.
फाेटाेचा संचच मुख्याधिकाऱ्यांना सुपूर्द
चामुंडा देवी मंदिर परिसरातील शेकडो नागरिकांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांच्या दालनात जाऊन तक्रार दिली. सोबतच विविध समस्यांच्या फोटोंचा संच त्यांना सुपूर्द केला. यावेळी महिलांनी आक्रमकपणे आपल्या समस्या मुख्याधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या. याप्रसंगी तक्रारीचे गांभीर्य समजून गायकवाड यांनी आपल्या यंत्रणेला सुचित करून प्राधान्याने समस्या सोडविण्याचे आदेश दिले.