शेकडो विद्यार्थ्यांचे जात पडताळणी अर्ज धूळ खात!
By Admin | Published: June 1, 2017 08:12 PM2017-06-01T20:12:07+5:302017-06-01T20:21:14+5:30
वाशिम : टाळाटाळ चालविल्यामुळे जातपडताळणी कार्यालयात जात पडताळणीचे शेकडो अर्ज धूळ खात पडून आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पुर्वी अकोला येथून चालणाऱ्या जातपडताळणी विभागाचा कारभार सहा महिन्यांपूर्वी वाशिममध्ये सुरू झाला. मात्र, आवश्यक कर्मचारीवर्ग देण्यास शासनाने टाळाटाळ चालविल्यामुळे या कार्यालयात जातपडताळणीसाठी येणारे नोकरदार, शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून जात पडताळणीचे शेकडो अर्ज धूळ खात पडून राहत आहेत.
वाशिममधील सामाजिक न्याय भवनातील इमारतीत जात पडताळणी विभागाचा कारभार सुरू झाला आहे. त्याठिकाणी दैनंदिन शेकडो जात पडताळणी अर्ज दाखल होत आहेत. ते निकाली काढण्यासाठी मात्र पुरेसे कर्मचारी देण्यात आलेले नाहीत. म्हणायला, कासार आणि पवार नामक दोन कर्मचारी याठिकाणी कायमस्वरूपी कार्यरत आहेत; परंतू तीन अधिकारी आणि ९ कर्मचाऱ्यांची आणखी आवश्यक असल्याने कामे प्रभावित होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सद्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यामुळे जात पडताळणीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. अशा स्थितीत पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवरच कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. जात पडताळणी विभागात आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, यासाठी शासनाकडे सलग पत्रव्यवहार सुरू आहे.
- माया केदार, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, वाशिम