खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे शेकडो गावे होणार बाधीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 03:25 PM2019-06-22T15:25:10+5:302019-06-22T15:25:36+5:30
खोदून ठेवलेल्या रस्त्यांवर चिखल साचून या मार्गांवरील वाहतूक पूर्णत: कोलमडण्याची तद्वतच शेकडो गावांचा तालुक्याशी संपर्क तुटण्याची भिती निर्माण झाली आहे.
- सुनील काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम-हिंगोली, कारंजा-वाशिम, मंगरुळपीर-आर्णी आणि मालेगाव-मेहकर या चार मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर सप्टेंबर २०१८ पासून रस्ते निर्मितीच्या कामास सुरूवात झाली; मात्र ९ महिने उलटूनही सर्वच ठिकाणची कामे अर्धवट अवस्थेत असून मोठ्या स्वरूपातील अथवा संततधार पाऊस झाल्यास खोदून ठेवलेल्या रस्त्यांवर चिखल साचून या मार्गांवरील वाहतूक पूर्णत: कोलमडण्याची तद्वतच शेकडो गावांचा तालुक्याशी संपर्क तुटण्याची भिती निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग निर्मितीअंतर्गत जिल्ह्यात कारंजा-वाशिम (६५), मंगरूळपीर-महान (३०) मंगरूळपीर-मानोरा (३०), मालेगाव-मेहकर (४०), मालेगाव-वाढोणा (४७), वाशिम-हिंगोली (४८) आणि कारंजा-मानोरा या ३५ किलोमिटर अंतराच्या रस्त्याचे चौपदरीकरण केले जात आहे; मात्र सुरूवातीपासूनच या ना त्या कारणांनी वादात सापडलेली रस्ते निर्मितीची कामे ९ महिने उलटूनही पूर्ण झालेली नाहीत. संबंधित कंत्राटदारांनी सर्वच ठिकाणच्या मार्गावरील जुने रस्ते पूर्णत: तोडून एका बाजूनेच सिमेंट-काँक्रीटीकरणाची कामे हाती घेतली. ती देखील अर्धवट अवस्थेत असून त्यावरून सुरळितपणे वाहतूक होणे शक्य नाही.
दरम्यान, सद्या सुरू असलेल्या पावसाळ्यात एखादवेळी मोठ्या स्वरूपातील अथवा संततधार पाऊस झाल्यास खोदून ठेवलेल्या रस्त्यांच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात चिखल साचण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे झाल्यास जिल्ह्यातील शंभरापेक्षा अधिक गावांचा वाशिम, मंगरूळपीर, कारंजा, रिसोड, मालेगाव, मानोरा या तालुका मुख्यालयांशी असलेला संपर्क पूर्णत: तुटणार आहे. याशिवाय संबंधित मार्गांवरून होणारी दैनंदिन वाहतूकही कोलमडण्याची भिती निर्माण झाली आहे. ही गंभीर बाब राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जाणून असतानाही निर्माणाधिन राष्ट्रीय महामार्ग निर्मितीदरम्यानच्या रस्त्यांवरून पावसाळ्यात वाहतूक सुरळित राहण्याबाबतच्या कुठल्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. काहीठिकाणी पर्यायी मार्ग तयार करण्यात आले; परंतु ते देखील कच्चा स्वरूपात असल्याचे दिसून येत आहे.
१६ एप्रिलच्या अवकाळी पावसाने उडाली होती दाणादाण
१६ एप्रिल २०१९ रोजी झालेल्या अवकाळी पावसाने मालेगाव ते वाढोणा या निर्माणाधिन राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजुला सर्वत्र मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने वाहतूक पूर्णत: ठप्प होवून नागरिकांची दाणादाण उडाली होती. अनेकांची चिखलात फसलेली वाहने बाहेर काढणे अशक्य झाले होते. मालवाहू वाहनांची वाहतूकही रात्रभर बंद होती. ही बाब लक्षात घेवून रस्ते निर्मितीच्या कामास गती मिळणे आवश्यक होते; मात्र ४७ किलोमिटर अंतराच्या या रस्त्याचे आजमितीस केवळ २० किलोमिटरच्या आसपासच एकीकडच्या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असून रस्त्याची दुसरी बाजू खोदून ठेवलेली असल्याने प्रश्न ‘जैसे थे’ आहे.
रस्त्यांच्या एका बाजूचे काँक्रीटीकरण; पण तेही अर्धवट
कारंजा-वाशिम, मंगरूळपीर-महान, मंगरूळपीर-मानोरा, मालेगाव-मेहकर, मालेगाव-वाढोणा, वाशिम-हिंगोली आणि कारंजा-मानोरा या राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेल्या रस्त्यांच्या चौपरीकरणाची कामे अत्यंत धिम्यागतीने सुरू असून रस्त्याच्या एका बाजूचे सिमेंट-काँक्रीटीकरण करण्यात आले; पण तेही अर्धवट स्थितीत असून तयार झालेल्या रस्त्यावरून पूर्ण क्षमतेने वाहतूक करता येणे अशक्य आहे. संततधार पाऊस झाल्यास त्याचा मोठा फटका नागरिकांना बसणार असून खेड्यापाड्यांमधील दळणवळणाचा मुख्य प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करायला हवी होती; मात्र आता पावसाळ्याला सुरूवात झाली असून कामे अर्धवट स्थितीत असतील तर चिखल साचून नागरिकांची निश्चितपणे गैरसोय होणार आहे. तथापि, जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग निर्मितीच्या सर्वच कामांचा विनाविलंब आढावा घेवून वाहतूक सुरळित राहण्याकरिता पर्यायी व्यवस्थेसाठी ठोस उपाययोजना करण्याबाबत संबंधित कंत्राटदारांना सूचना दिल्या जातील.
- ऋषीकेश मोडक, जिल्हाधिकारी, वाशिम