शंभर वर्षांपासूनच्या विहिरींचे संशोधन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:27 AM2021-06-10T04:27:33+5:302021-06-10T04:27:33+5:30
वाशिम : पूर्वी अगदीच १० ते १५ फूट जमीन खोदली तरी पक्क्या पाण्याचे झरे मिळायचे. कालांतराने जमिनीला ठिकठिकाणी खड्डे ...
वाशिम : पूर्वी अगदीच १० ते १५ फूट जमीन खोदली तरी पक्क्या पाण्याचे झरे मिळायचे. कालांतराने जमिनीला ठिकठिकाणी खड्डे पाडून विहिरी तयार करण्याची जणू स्पर्धाच लागली. यामुळे गावागावात विहिरींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली; मात्र यामुळे जलस्रोताची पातळीदेखील दिवसागणिक खोलवर गेली. दरम्यान, गावात पहिली विहीर कधी खोदल्या गेली, त्यास किती फुटावर पाणी लागले होते आणि आता स्थिती काय, याबाबतचा अभ्यास करण्यासाठी समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत राज्यातील ८०० पेक्षा अधिक गावांमध्ये संशोधन केले जात आहे.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पर्यावरण, अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा आयोजित करण्यात आली. याअंतर्गत प्रामुख्याने पाण्याचा शाश्वत वापर (जल व्यवस्थापन) आणि पर्यावरणाचे पुर्नसंचयन (पर्यावरणाचे आरोग्य सुधारणे) या बाबींवर भर दिला जात आहे. राज्यातील ज्या ८०० पेक्षा अधिक गावांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत मृदा आणि जलसंधारणाचा टप्पा पार केला, त्या गावांचा समृद्ध गाव स्पर्धेत समावेश झालेला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने जल व्यवस्थापन, पीक व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. गावाची भाैगोलिक स्थिती, दरवर्षी होणारे पर्जन्यमान आणि पाण्याचा विविध कारणांसाठी होणारा वापर याचा ताळेबंद गावकऱ्यांनी स्वत:च तयार करून जल व्यवस्थापन करण्यासंबंधी प्रभावी जनजागृती केली जात आहे.
त्यानुषंगाने गावात पहिली विहीर नेमकी कधी खोदल्या गेली, त्यास किती फुटावर पाणी लागले होते, त्या विहिरीत उपलब्ध पाण्याची सध्या स्थिती काय, गेल्या काही वर्षांत कूपनलिका खोदण्याचे प्रमाण किती, आदिंबाबतचा ‘डाटा’ गावकऱ्यांकडूनच गोळा करून घेतला जात आहे. यासह गावात सध्या उपलब्ध विहिरी आणि कूपनलिकांमधील उपलब्ध पाण्याचे वर्षातून चारवेळा मोजमाप करून त्यानुसार पीक व्यवस्थापन करण्यासंबंधीचे धडेही गिरविले जात आहेत. यामाध्यमातून समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी ८०० पेक्षा अधिक गावांमधील गावकरी पाण्याच्या बाबतीत जागरूक होत असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
.....................
बाॅक्स :
भूजल टाकी रिक्त होऊ नये!
गेल्या अनेक वर्षांत कुठल्याही गावातील शिवार क्षेत्रात विशेष वाढ झालेली नाही. भूगर्भात स्वत:हून पाणी निर्माण होत नाही; तर दरवर्षीच्या पर्जन्यमानावर ही बाब पूर्णत: विसंबून आहे. अशा स्थितीत जमिनीला ठिकठिकाणी शेकडो फुटांचे खड्डे पाडून विहीर अथवा कूपनलिकांची संख्या वाढविण्याची जणू स्पर्धा लागलेली आहे. यामुळे कधीकाळी कधीच न आटणारी विहीर अथवा कूपनलिका आजमितीस कोरड्या राहत असल्याचे दिसत आहे. तथापि, किमान आतातरी भूगर्भातील पाण्याचा बेसुमार उपसा थांबणे आवश्यक आहे; अन्यथा गाव शिवारातील भूजल टाकी रिक्त होण्याची भीती असून ही बाब समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून गावोगावच्या लोकांना पटवून देण्यात येत आहे.
......................
कोट :
गावातील उपलब्ध जलस्त्रोत अधिक बळकट व्हावे, दरवर्षी होणाऱ्या पर्जन्यमानाचा सखोल अभ्यास करून त्यानुसार गावकऱ्यांनी जल व पीक व्यवस्थापन करावे, यासंबंधी समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. गावात पहिली विहीर कधी खोदल्या गेली, तेव्हापासून आजतागायत खोदलेल्या विहिरी व कूपनलिकांची संख्या किती, याचाही ताळेबंद गावकऱ्यांच्या माध्यमातून तयार करून घेतला जात आहे.
- सुभाष नानवटे
समन्वयक, पश्चिम वऱ्हाड, समृद्ध गाव स्पर्धा