दारू दुकानाविरोधातील उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:26 AM2021-07-09T04:26:46+5:302021-07-09T04:26:46+5:30
कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयासमोरील दारूचे दुकान हटविण्यासाठी यापूर्वी भुलोडा येथील तंटामुक्ती अध्यक्ष विनोद नंदागवळी यांनीही आमरण उपोषण ...
कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयासमोरील दारूचे दुकान हटविण्यासाठी यापूर्वी भुलोडा येथील तंटामुक्ती अध्यक्ष विनोद नंदागवळी यांनीही आमरण उपोषण केले होते. त्यावेळी जि. प. विद्यालय व देशी दारूचे दुकान यामधील अंतराची संबंधित खात्याने थातुरमातूर मोजणी करून, दुकान नियमानुसार योग्य अंतरावर असल्याचा निर्वाळा संबंधित खात्याने ऑन दी स्पाॅट दिला होता. तेव्हा संबंधित खाते देशी दारू दुकानदारास पाठीशी घालत असल्याचा आरोप उपोषणार्थीसह कामरगावातील इतर नागरिकांनी केला होता. सध्या गेल्या चार दिवसांपासून याच मागणीसाठी इंगळे यांचे आमरण उपोषण सुरू असून, चार दिवस उलटले तरी, एकाही अधिकाऱ्याने उपोषण मंडपास भेट देऊन इंगळे यांच्या मागण्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.
-------------------
दारू दुकान हटविण्यासह इतरही मागण्या...
कामरगावातील देशी दारू दुकान हटविण्याबरोबरच कामरगाव महावितरण कार्यालयाअंतर्गत विविध गावांत गावठाण व कृषी फिडरवर २४ तास वीज पुरवठा सुरू ठेवावा व कामरगाव येथील इंदिरानगर व इतर नगरात अतिक्रमण करून राहत असलेल्या नागरिकांच्या आठ अ वरील सरकार काढून त्यांना त्यांच्या मालकीचे आठ अ करून द्यावे, अशा मागण्या प्रकाश इंगळे यांनी प्रशासनापुढे मांडल्या आहेत. त्यामुळे हे देशी दारूचे दुकान हटविण्याबाबत किंवा गावाबाहेर नेण्याबाबत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे कामरगाव परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.