घर मोडून बेघर करणाऱ्यांविरूद्ध कारवाई व्हावी - पारधी कुटूंबाचे उपोषण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 06:16 PM2018-12-05T18:16:24+5:302018-12-05T18:16:52+5:30
पांगरखेडा येथील भवरलाल माणिक पवार यांच्यासह कुटूंबियांनी मंगळवार, ४ डिसेंबरपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गौळखेडा ते पांगरखेडा रस्त्याला लागून असलेल्या शासकीय जागेतील टिनशेडचे घर मोडून बेघर करणाऱ्यांविरूद्ध कारवाई व्हावी, या मागणीसाठी पांगरखेडा येथील भवरलाल माणिक पवार यांच्यासह कुटूंबियांनी मंगळवार, ४ डिसेंबरपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
यासंदर्भात भवरलाल पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की मी कुटूंबासह गेल्या ७ वर्षांपासून शासकीय जागेत टिनशेडचे घर बांधून राहत आहे. २५ नोव्हेंबर २०१८ रोजी भगवान शिंदे, किशोर गावंडे, गणेश गावंडे, सुनील गावंडे आणि नथ्थू गावंडे यांनी घर तोडण्याचा प्रयत्न केला. त्याची तक्रार शिरपूर पोलिसांत करण्यात आली. मात्र, कारवाई न झाल्याने संबंधितांनी पुन्हा २७ नोव्हेंबर २०१८ रोजी घरातील सामान फेकून देत घरावरील टिनांची फेकफाक केली आणि आम्हाला बेघर केले. संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.