वाशिम जिल्ह्यात वर्षभरात ३६ वन्यप्राण्यांची शिकार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 01:12 PM2020-10-07T13:12:22+5:302020-10-07T13:14:05+5:30
Hunting of wild animals, Washim गत वर्षभरात जिल्ह्यात ३६ वन्यपशूंची शिकार झाली आहे.
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अलिकडच्या काळात जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या शिकारीत वाढ होत असल्याने त्यांच्या संरक्षणासाठी वन्यप्रेमी, वनविभागाबरोबरच समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे गरजेचा ठरत आहे. गत वर्षभरात जिल्ह्यात ३६ वन्यपशूंची शिकार झाली आहे.
निसर्गाचे चक्र समतोल ठेवण्यात वन्यपशू, प्राण्यांची भूमिका महत्वाची आहे. वन्यपशू ही निसर्गाची देणगी आहे. जिल्ह्यात दाट अभयारण्य नाही; परंतू मालेगाव, कारंजा, मानोरा या तालुक्यात जंगल असून तेथे बिबट, हरीण, निलगाय, मोर यासह अन्य वन्यपशूपक्ष्यांचे वास्तव आहे. वन्यपशूंचे संरक्षण करण्यासाठी वनाधिकारी, कर्मचारी यांच्याप्रमाणेच वन्यप्रेमी प्रयत्नशील आहेत तर दुसरीकडे या वन्यपशूंना टिपण्यासाठी शिकारीही आघाडीवर असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात प्रामुख्याने मांसाहार म्हणून हरीण, मोराची शिकार जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. गतवर्षभरात ३६ वन्यपशूंची शिकार झाली आहे. काही शिकारींवर वनविभागाने प्रतिबंधात्मक कारवायादेखील केल्या. जंगली भागात शिकार केल्यानंतर काही घटना उघडकीस येतात तर काही घटना उघडकीस येत नसल्याने त्याची नोंद होत नाही. निसर्गाची देणगी असलेल्या वन्यपशूंचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतल्यास शिकारीवर आपसूकच नियंत्रण मिळविता येईल, यात शंका नाही.