शाळांमध्ये आधार अपलोड करण्याची लगीनघाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 04:41 PM2020-05-24T16:41:10+5:302020-05-24T16:41:18+5:30
आता शाळांमध्ये आधार अपलोड करण्याची लगीनघाई सुरू असून त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करणे अत्यावश्यक असून, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ‘स्टुडंट पोर्टल’वर आधार विषयक नोंद केलेल्या विद्यार्थ्यांची संख्याच संच मान्यता करताना विचारात घेतली जाणार आहे. परिणामी, आता शाळांमध्ये आधार अपलोड करण्याची लगीनघाई सुरू असून त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे.
राज्यातील प्राथमिक ते माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेची प्रक्रिया, ‘एनआयसी’मार्फत जिल्हास्तरावर शिक्षणाधिकाºयांमार्फत होत असते. या अनुषंगाने राज्याच्या शिक्षण विभागाने २०१९ -२० मध्ये स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थी विषयक माहितीची नोंद करताना आधार क्रमांकाची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. असे असले तरी अनेक शाळांनी विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांकडे आधार कार्ड असतानाही त्यांचे आधार क्रमांक अपडेट केले नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करणे आणि ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही, त्या विद्यार्थ्यांकडून आधार कार्ड उपलब्ध करुन घेणे, याबाबतचे आदेश शिक्षण विभागाने २० मे रोजी दिले. उन्हाळी सुट्यांमध्ये हे काम करावे तसेच सुट्या, लॉकडाऊन संपल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही, त्यांचे आधार कार्ड काढण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना आहेत. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शाळांच्या संच मान्यतेसाठी ज्या विद्यार्थ्यांची आधारविषयक माहिती स्टुंडट पोर्टलवर नोंद केलेली असेल, अशा विद्यार्थ्यांची संख्याच संच मान्यतेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे गटशिक्षणाधिकाºयांनी तालुक्यातील आधारकार्ड काढलेल्या विद्यार्थ्यांच्या स्टुडंट पोर्टलवरील माहितीच्या आधारे आढावा घ्यावा व आधारकार्ड काढणाºया यंत्रणेच्या तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय समन्वयक यांच्याशी संपर्क साधून सर्वच विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढले जातील, याची दक्षता घ्यावी, असेही आदेशात नमूद आहे .