पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीस सश्रम कारावास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 10:57 AM2020-12-14T10:57:30+5:302020-12-14T11:00:16+5:30
Washim Crime News पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा येथील तदर्थ जिल्हा न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी ११ डिसेंबर रोजी सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गजानन हिंमत कंकाळ (रा. मोप. ता. रिसोड) या आरोपी पतीस पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा येथील तदर्थ जिल्हा न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी ११ डिसेंबर रोजी सुनावली.
बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील शिवनी जाट येथील रहिवासी सेवानिवृत्त शिक्षक परसराम भिकाजी सुर्वे यांनी १ फेब्रुवारी २०१६ रोजी या घटनेची फिर्याद रिसोड पोलीस स्टेशनला दिली होती. परसराम सुर्वे यांची मुलगी स्मिता हिचा विवाह मोप येथील गजानन हिंमत कंकाळ याच्याशी झाला होता. स्मिता ही मोप येथे परिचारिका होती. गजानन हा नेहमी तिच्या चारित्र्यावर संशय घेता होता. यातूनच तो तिला नेहमी शारीरिक व मानसिक त्रास द्यायचा. या त्रासाला कंटाळून स्मिताने आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येस पतीसह सासरची मंडळी जबाबदार असल्याचे परसराम सुर्वे यांनी फिर्यादीत म्हटले होते. याप्रकरणी रिसोड पोलिसांनी आरोपी पती गजानन कंकाळ, सासरा हिंमत रायभान कंकाळ व भाया विजय हिंमत कंकाळ यांच्या विरुद्ध कलम ४९८ अ,३०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. या प्रकरणात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी पुराव्यावरून दोषी आढळून आल्याने आरोपी पती गजानन कंकाळ यास भादंवि कलम ४९८ अ मध्ये दोन वर्षे सश्रम कारावास तसेच एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास तसेच भादंवि कलम ३०६ मध्ये पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा तसेच दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पुन्हा तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा तदर्थ जिल्हा न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी ठोठावली. आरोपीस या दोन्ही शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. अन्य आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता माधुरी मिसर यांनी तसेच कोर्ट पैरवी म्हणून अमर ठाकूर यांनी काम पाहिले.