हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस जूनअखेरपर्यंत धावणार
By दिनेश पठाडे | Published: March 26, 2024 02:08 PM2024-03-26T14:08:32+5:302024-03-26T14:08:43+5:30
अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या हैदराबाद-जयपूर-हैदराबाद विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्यात आली आहे.
वाशिम: उन्हाळी सुट्या, लग्नसराई, विविध सणवारामध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या हैदराबाद-जयपूर-हैदराबाद विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार ही विशेष रेल्वे आता जूनअखेरपर्यंत धावणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वेने २६ मार्च रोजी अनेक विशेष रेल्वेना मुदतवाढ दिली आहे. त्यामध्ये नांदेड विभागातून पूर्णा-अकोला रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेसचा देखील समावेश आहे. नांदेड विभागातील जनसंपर्क कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार मार्चअखेरपर्यंत प्रस्तावित असलेली गाडी क्रमांक ०७११५ हैदराबाद-जयपूर साप्ताहिक एक्स्प्रेसला ५ एप्रिल ते २८ जूनपर्यंत मुदतवाढ दिली. ही रेल्वे प्रस्थान स्थानकावरुन दर शुक्रवारी रात्री २० वाजून २० मिनिटांनी सुटेल.
दुसऱ्या दिवशी सकाळी ४:०४ वाजता वाशिम स्थानकावरुन पोहचून अकोला मार्गे जयपूर येथे सायंकाळी १७:२५ वाजता पोहचेल. तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०७११६ जयपूर-हैदराबाद एक्स्प्रेसला ७ एप्रिल ते ३० जूनपर्यंत देण्यात आली असून ही गाडी जयपूर येथून दर रविवारी दुपारी १५:३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी वाशिम स्थानकावर दुपारी १६:१४ वाजता पोहचून हैदराबाद येथे सकाळी ३ वाजता पोहचेल. ही गाडी निजामाबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, खंडवा मार्गे धावणार आहे. त्यामुळे या मार्गाने विविध ठिकाणी रेल्वे प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.