जिल्हा कोविड रुग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:43 AM2021-05-21T04:43:50+5:302021-05-21T04:43:50+5:30

वाशिम : जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील सरकारी जिल्हा कोविड रुग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा उडत असल्याने रुग्णांना कोरोनाबरोबरच मनस्तापही सहन करावा ...

Hygiene problem in District Kovid Hospital! | जिल्हा कोविड रुग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा !

जिल्हा कोविड रुग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा !

Next

वाशिम : जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील सरकारी जिल्हा कोविड रुग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा उडत असल्याने रुग्णांना कोरोनाबरोबरच मनस्तापही सहन करावा लागत असल्याचा प्रकार २० मे रोजी समोर आला. यासंदर्भातील चित्रीकरण व छायाचित्र हे समाजमाध्यमांमध्ये ‘व्हायरल’ झाले असून, स्वच्छतेसंदर्भात आरोग्य विभागासह प्रशासन कोणते पाऊल उचलते याकडे रुग्णांसह नातेवाइकांचे लक्ष लागून आहे.

दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालय यासह खासगी कोविड हॉस्पिटलला मंजुरी देण्यात येत आहे. वाशिम येथे जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात जिल्हा कोविड रुग्णालय असून, येथे ऑक्सिजनसह व्हेंटिलेटर बेडची सुविधा उपलब्ध आहे. मध्यम व गंभीर स्वरूपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना येथे उपचारार्थ दाखल केले आहे. दरम्यान, येथे नियमित स्वच्छता होत नसल्याचा आरोप रुग्ण व नातेवाइकांमधून केला जात आहे. २० मे रोजी यासंदर्भात छायाचित्र व चित्रीकरण हे समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाले आहे. बेडजवळ असलेल्या कचराकुंडीत केरकचरा व अन्य टाकाऊ साहित्य पडून असल्याचे या चित्रीकरणात दिसून येत असून, याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला. शौचालयाची सफाईदेखील नियमित होत नसून, यामुळे रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत असल्यासंदर्भातील ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी रुग्ण व नातेवाइकांमधून होत आहे.

००००

कोट

जिल्हा कोविड रुग्णालयातील स्वच्छता, साफसफाई नियमित केली जात आहे. आज संबंधित सफाई कामगारांकडून सकाळच्या सुमारास थोडा विलंब झाला होता. यासंदर्भातील माहिती मिळताच तातडीने स्वच्छता व साफसफाई करण्यात आली. स्वच्छतेसंदर्भात दिरंगाई करू नये, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या.

- डॉ. मधुकर राठोड

जिल्हा शल्य चिकित्सक

०००

कोट बॉक्स

जिल्हा कोविड रुग्णालयातील एका रुग्णाच्या नातेवाइकाने आपल्याशी मोबाइलवर संपर्क साधून अस्वच्छतेसंदर्भात व्यथा मांडल्या. सोबतच छायाचित्र व व्हिडिओदेखील पाठविले. या प्रकाराची माहिती संबंधिताना देण्यात आली. नियमित स्वच्छता करून रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्या, अशी अपेक्षा आहे.

- मनीष मंत्री

जिल्हा सचिव

व्यापारी मंडळ, वाशिम

.....

Web Title: Hygiene problem in District Kovid Hospital!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.