'ऑथराईझ नाही मी तुम्हाला काही सांगायला..." परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर वाशिममध्ये रुजू
By नंदकिशोर नारे | Published: July 11, 2024 06:53 PM2024-07-11T18:53:40+5:302024-07-11T18:56:15+5:30
वेळापत्रकानुसार दिली जाणार जबाबदारी
वाशिम : विविध विषयांबाबत गाजत असलेल्या आयएएस अधिकारी पुजा खेडकर ‘ऑथराईझ नाही मी तुम्हाला काही सांगायला’ असे म्हणत गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्यात.
परीविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू हाेणार तेव्हा पत्रकारांनी त्यांच्यावर हाेत असलेल्या आराेपाबाबत त्यांना छेडले असता त्यांनी स्वाॅरी, गर्व्हमेंट रुलनुसार मी तुम्हाला काहीही सांगायला तयार नसल्याचे म्हणत पदभार स्विकारला. त्यांची पुणे येथून वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे. त्यांना ठराविक वेळापत्रकानुसार जबाबदारी दिली जाणार आहे.
महाराष्ट्र केडरच्या २०२२ बॅचच्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर व्हीआयपी मागण्यांमुळे वादात सापडल्या आहेत. तसेच त्यांनी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी बनावट दृष्टिदोष (व्हिज्युअली इम्पेअर्ड) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रमाणपत्र कथितपणे सादर केली, असा खुलासा एका अधिकाऱ्याने बुधवारी केला. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ॲंटी चेंबरवर कब्जा करण्यासह पूजा खेडकर त्यांच्या खासगी ऑडी कारवर लाल-निळा दिवा आणि व्हीआयपी नंबर प्लेट वापरत होत्या, तसेच प्रोबेशनरी आयएएस अधिकारी असताना पदाचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्याविरोधात तक्रारी झाल्या. त्याची दखल घेत त्यांची पुण्याहून वाशिमला बदली करण्यात आली, त्यामुळे त्या चर्चेत आहेत. वाशिम येथे रुजू हाेतांना त्यांनी आपण वाशिममध्ये काम करण्यास उत्सूक असल्याचेही बाेलल्यात.