प्रायोगिक तत्त्वावर पाचवा वर्ग ऑलाईन करण्याचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:19 PM2020-07-13T17:19:18+5:302020-07-13T17:19:30+5:30
पाचवा वर्ग प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याबाबत चर्चा झाली; परंतु त्यावर अंतीम निर्णय झालेला नाही.
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम : यंदाच्या शैक्षणिक सत्राबाबत शासनाकडून अद्यापही कोणताच ठाम निर्णय घेण्यात आला नाही. काही खासगी शाळांनी ऑनलाईन पद्धतीने शैक्षणिक सत्राला सुरुवात केली असली तरी, त्याचाही फारसा फायदा होत नसल्याचे दिसत आहे. तीन दिवसांपूर्वी अमरावती येथे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती विभागातील स्थितीचा आढावा घेतला. यावेळी पाचवा वर्ग प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याबाबत चर्चा झाली; परंतु त्यावर अंतीम निर्णय झालेला नाही.
कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यात अद्यापही यंदाच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झालेली नाही. राज्यशासनाकडून याबाबत अद्याप कोणताही ठाम निर्णय घेण्यात आला नाही. त्यातच शाळा सुरू करण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी, ग्रामपंचायत आणि स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीला दिल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. तथापि, अमरावती विभागातील कोणत्याही जिल्ह्यात जिल्हाधिकारी अथवा ग्रामपंचायतींसह स्थानिक शाळा व्यवस्थापन समित्यांकडूनही याबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शासकीय शाळांतूनही कोणत्याच हालचाली नाहीत. काही खासगी शाळांनी आॅनलाईन वर्ग सुरू केले आहेत. त्यातही अनेक पालकांची स्मार्ट फोन घेण्याची ऐपत नाही. शिवाय या ऑनलाईन पद्धतीत विद्यार्थी अभ्यासात एकाग्र होत नसल्याचेही दिसत आहे. त्यामुळे पालकवर्गात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन दिवसांपूर्वी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तीन दिवसांपूर्वी अमरावती येथे विभागातील शैक्षणिक सत्राची तयारी व इतर उपाय योजनांचा आढावा घेतला. त्यात शासकीय शाळांत पाचवा वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याबाबत चर्चा झाली. तथापि, त्यावरही अंतीम निर्णय झालेला नाही. नेमका हा वर्ग कसा सुरू करणार, विद्यार्थ्यांच्या स्मार्ट फोनच्या अडचणी कशा सोडविणार, आदिविषयी काहीही ठरलेले नाही.
शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी तीन दिवसांपूर्वी विभागातील यंदाच्या शैक्षणिक सत्राबाबतच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी विविध विषयावर चर्चा झाली आणि त्यांनी काही सुचनाही केल्या. या सभेत प्रायोगिक तत्त्वावर पाचवा वर्ग आॅनलाईन पद्धतीने सुरू करण्याबाबत चर्चा झाली; परंतु कोणताही अंतीम निर्णय होऊ शकला नाही.
-गजाननराव डाबेराव
प्रभारी, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जि.प. वाशिम: