महामार्गातील जमीन शेतकऱ्यांची असल्यास मोबदला देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:27 AM2021-06-22T04:27:38+5:302021-06-22T04:27:38+5:30
मानोरा तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१-ए जातो. या मार्गाच्या कामासाठी शेतजमीन घेतल्याची तक्रार करीत वाईगौळ या गावातील तीन शेतकऱ्यांनी ...
मानोरा तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१-ए जातो. या मार्गाच्या कामासाठी शेतजमीन घेतल्याची तक्रार करीत वाईगौळ या गावातील तीन शेतकऱ्यांनी गत महिन्यात सलग १५ दिवस उपोषण केले होते. त्यावेळी खासदार भावना गवळी व शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र पवार यांच्या हस्ते त्यांनी उपोषण सोडले होते. त्यानंतर सोमवार, २१ जून रोजी पोलीस बंदोबस्तात हे काम सुरू करण्यासाठी महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदार यांनी प्रयत्न केला. त्याला शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र पवार, श्रीकृष्ण राठोड, मनोहर राठोड यांनी प्रत्यक्ष स्थळी उपस्थित राहून कडाडून विरोध केला. यावेळी मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिशिर मानकर यांनी मध्यस्थी करून सामंजस्याने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. त्याचवेळी भूमी अभिलेख कार्यालयाकडील मोजणीदरम्यान जर महामार्गात जात असलेली जागा शेतकऱ्यांची असल्याचे निदर्शनास आले, तर शासकीय नियमानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मोबदला देण्यास तयार राहील, असे लेखी आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले.
-----------
अपघातप्रवण स्थळ बनल्याने शेतकऱ्यांची सामंजस्याची भूमिका
जुना डांबरी रस्ता उखडून नवीन रस्त्याकरिता मुरूम टाकला होता. परंतु, त्याठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी साचले होते व त्याठिकाणी अपघाताची भीती मोठ्या प्रमाणात उद्भवली होती. त्याकारणाने शेतकऱ्यांनी सार्वजनिक हित लक्षात घेता रस्त्याचे काम करण्यासाठी सामंजस्याची भूमिका घेतली.
-----------
मोबदला मिळण्यासाठी खासदार भावना गवळी आग्रही
गत महिन्यापासून उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळावा याकरिता खासदार भावना गवळी आग्रही आहेत. याबाबत त्यांच्याकडून सातत्याने विविध स्तरावर चर्चा आणि पाठपुरावा सुरू असल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळणारच, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये पल्लवित झाली आहे.
---------------
रवींद्र पवार यांचा शेतकऱ्यांच्या हितासाठी आक्रमक पवित्रा
शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र पवार यांनी सतत वाईगौळ येथील शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून या बाधित शेतकऱ्यांना मोबदला कसा मिळेल यासाठी वेळोवेळी आक्रमक भूमिका बजावलेली आहे. आज प्रत्यक्ष स्थळी उपस्थित राहून उपविभागीय अभियंता यांना आपल्या शिवसेना शैलीत चांगलेच खडसावले व त्यानंतर पनपलिया यांनी लेखी पत्र देण्याची तयारी दर्शविली.