वाशिम : गावात शाळाच नसली तर गोरगरीब मुले शिकतील कसे? वाशिम जिल्ह्यातील नऊ शाळांवर गडांतर
By संतोष वानखडे | Published: May 4, 2023 06:04 PM2023-05-04T18:04:37+5:302023-05-04T18:04:50+5:30
कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषदेच्या शाळा क्लस्टर शाळेला जोडण्याच्या हालचाली सुरू असल्याने, कमी पटसंख्या असणाऱ्या गावात यापुढे जि.प.ची शाळा नसणार हे स्पष्ट होत आहे.
वाशिम : कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषदेच्या शाळा क्लस्टर शाळेला जोडण्याच्या हालचाली सुरू असल्याने, कमी पटसंख्या असणाऱ्या गावात यापुढे जि.प.ची शाळा नसणार हे स्पष्ट होत आहे. गावात शाळाच नसली तर गोरगरीबांची मुले शिकतील कसे? असा प्रश्न उपस्थित करून कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषदेच्या शाळा क्लस्टर शाळेला न जोडण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य सरस्वती मोहन चौधरी यांनी ४ मे रोजी शिक्षणाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनानुसार, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वांगीन विकास करण्याकरीता कमी पट संख्या असणाऱ्या शाळेवर शासनाच्या माध्यमातून क्लस्टर शाळा हा पर्याय निर्माण अवस्थेत आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यात ९ ते १० यांसह राज्यभरातील ४५०० शाळा बाधित होण्याची भीती आहे. राज्यातील आठ हजारावर शिक्षकांच्या समायोजनाचाही प्रश्न निर्माण होईल. राज्यशासन त्या आठ हजार शिक्षकांना कुठेतरी पर्याय म्हणून समायोजन करेल. परंतु त्या ४५०० गावातून यापुढे जि.प.ची शाळाच नसणार आहे. त्यामुळे त्या गावातील गोरगरीब मुलांनी शिक्षण कसे घ्यावे? असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य सरस्वती चौधरी यांनी उपस्थित केला. ग्रामीण भागातील प्रत्येक खेड्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचे धडे मिळावे याकरीता कमी पटसंख्येच्या जि.प. शाळा क्लस्टर शाळेला जोडण्यात येवू नये, अशी मागणीही चौधरी यांनी केली.
जिल्ह्यातील ९ शाळांवर गडांतर?
कमी पटसंख्येच्या शाळा क्लस्टर शाळेला जोडल्यास जिल्ह्यातील ९ ते १० जिल्हा परिषद शाळांवर गडांतर येण्याची भीती वर्तविण्यात आली. या खेड्यांतील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्नही गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे शिक्षणाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी जि.प. सदस्य चौधरी यांनी गुरूवारी केली.