शासकीय कागदपत्रे हवीत तर पाच झाडे लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 03:12 PM2019-06-30T15:12:04+5:302019-06-30T15:12:17+5:30
गावातील प्रत्येक व्यक्तीला पाच झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, ही जबाबदारी पार पाडली, तरच शासकीय कागदपत्रे दिली जातील, असा ठरावच ग्रामसभेत घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: तालुक्यातील टणका गटग्रामपंचायतने पर्यावरणवृद्धीचा संकल्पच केला आहे. या अंतर्गत गावातील प्रत्येक व्यक्तीला पाच झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, ही जबाबदारी पार पाडली, तरच शासकीय कागदपत्रे दिली जातील, असा ठरावच २९ जुनच्या ग्रामसभेत त्यांनी घेतला आहे. प्रत्येक व्यक्तीला ग्रामपंचायत मोफत वृक्षरोपांचे वितरण करणार आहे.
राज्याच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेला सोमवार १ जुलैपासून सुरुवात होणार आहे. या अंर्तगत वाशिम जिल्ह्यात शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत ४० लाख ३ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक वनीकरण आणि वनविभागाने रोपांची जुळवाजुळव केली आहे. वृक्ष लागवड अभियानाच्या आराखडा सभेत सर्व प्रशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, निमशासकीय संस्था आणि शैक्षणिक संस्थांचे उद्दिष्टही निश्चित करण्यात आले आहेत. त्या ग्रामपंचायतींसाठीही स्वतंत्र उद्दिष्ट असून, बहुतांश ग्रामपंचायतींनी या वृक्ष लागवडीची तयारी केली आहे. त्यात वाशिम तालुक्यातील टणका गट ग्रामपंचायतचाही समावेश आहे. या गटग्रामपंचायत अंतर्गत येणाºया टणका, झोडगा आणि सोनगव्हाण या तिन्ही गावांत ई-क्लास जमिनीसह शेतीच्या बांधावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तथापि, पर्यावरण वृद्धीचा संकल्पच या ग्रामपंचायतने केला आहे. त्यामुळे निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्याचे ग्रामपंचायतने ठरविले आहे. यासाठी सरपंच शरद गोदारा यांच्या अध्यक्षतेखाली २९ जुन रोजी ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत गटग्रामपंचायत अंतर्गत येणाºया तिन्ही गावांतील प्रत्येक व्यक्तीला ५ वृक्षरोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्याचा ठराव घेण्यात आला. ही अट पूर्ण केल्याशिवाय कोणतीही शासकीय कागदपत्रे ग्रामपंचायतकडून दिली जाणार नाहीत, असा पावित्राच घेण्यात आला आहे. या वृक्ष लागवडीसाठी ग्रामपंचायत ६ जुलैपासून प्रत्येक व्यक्तीला मोफत वृक्षरोपांचे वितरण करणार आहे, अशी माहिती सरपंच शरद गोदारा यांनी दिली आहे.