अवैध वृक्षतोडीकडे वनविभागाची डोळेझाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 05:56 PM2017-10-01T17:56:59+5:302017-10-01T17:56:59+5:30
मानोरा: तालुक्यातील कोंडोली ग्रामपंचायतच्या हद्दीत हिरव्यागार वृक्षांची सर्रास कत्तल सुरू असून, या संदर्भात माहिती असतानाही वनविभाग आणि महसूल प्रशासनाकडून वृक्षतोड करणाºयांवर कसलीही कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे वृक्षांची कत्तल थांबविण्यासाठी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाचीही अद्याप प्रशासनाने दखल घेतली नाही.
कोंडोली येथील ग्रामपंचायतच्या हद्दीत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील महारुख, बाभूळ, तसेच नदीकाठी असलेल्या अंजनाचे वृक्ष गेल्या काही दिवसांपासून अवैध पद्धतीने कापण्यात आली असून, हा प्रकार सुरूच आहे. वृक्षांची कत्तल करण्यात येत असल्याचे दिसत असतानाही महसूल प्रशासन आणि वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांकडून अद्याप याची दखल घेऊन कारवाई करण्यात आली नाही. विशेष म्हणजे ही वृक्षतोड थांबविण्यासाठी गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी मानोराच्या तहसीलदारांकडे निवेदनही सादर केले; परंतु त्याचीही दखल घेण्यात आली नाही. गेल्या काही दिवसांत कोंडोली परिसरात महारूखाची दोन, बाभळीची ११, कडूनिंबाची ३ आणि अंजनाची ३ मिळून तब्बल १९ हिरव्या वृक्षांची खुलेआम कत्तल करण्यात आली आहे. त्यामधील केवळ ३ वृक्ष तोडल्याचा पंचनामा करून तलाठ्यांनी या संदर्भातील अहवाल १५ दिवसांपूर्वी सादर केला असला तरी, कारवाई झाली नसल्याने वृक्षतोड सुरूच आहे. विशेष म्हणजे ही झाडे तोडण्यात येत असताना ग्रामस्थांनी संबंधितांना आवर घालून तलाठ्यांना प्रत्यक्ष परिस्थिती दाखविली; परंतु त्यावेळी तलाठी कारवाई न करताच निघून गेले. एकिकडे शासन दरवर्षी कोट्यवधी वृक्षांची लागवड करून ती जगविण्याची जबाबदारीही संबंधित प्रशासनाकडे सोपवित आहे, तर दुसरीकडे त्याच प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी हिरव्यागार वृक्षांची कत्तल होत असताना कोणतीही कारवाई करीत नाहीत, हा प्रश्न अनाकलनीय आहे.