बायोमेट्रिक प्रणालीच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष
By admin | Published: May 17, 2017 01:42 AM2017-05-17T01:42:08+5:302017-05-17T01:42:08+5:30
रेशन दुकानदार उदासीन: पारदर्शक व्यवस्थेबाबत शासनाच्या उद्देशाला तडा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शास शासनाच्या योजनेतून घेतलेले श् रेशन प्रणालीत पारदर्शकता येण्यासह गैरप्रकारांवर आळा बसण्यासाठी शासनाच्यावतीने बायोमेट्रिक रेशन प्रणालीचा अंगीकार करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यातही या प्रणालीसाठी आवश्यक प्रक्रिया पार पडली असली तरी, अनेक रेशन दुकानदार अद्यापही या प्रणाली अंतर्गत पॉस मशीनचा वापर करीत नसल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत एकूण ७७४ पीओएस मशिनचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्वच रेशन दुकानदारांना संबंधित तहसील कार्यालयाच्यावतीने पीओएस मशीन वाटप करण्यात आले असून, दुकानदारांना या मशिनच्या वापराचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या प्रणाली नुसार स्वस्तधान्य कार्डधारकांना आता मशीनमध्ये पीओएस केल्यानंतर धान्याचे वाटप करणे आवश्यक आहे. मशीनमध्ये पीओएस केल्यानंतर ज्या कुटूंबातील शिधापत्रिका धारकाचे आधारकार्ड आॅनलाईन नोंदणी असेल तेवढयाच लोकांचे धान्य मिळणार आहे. स्वस्त धान्य विभागातील काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. प्रत्येक रेशन दुकानदाराला शासन पीओएस मशीन उपलब्धही करून देण्यात आली असून, या मशीनमध्ये शिधापत्रिकाधारकांची माहिती टाकण्यात आली आहे. मशीनला अंगठ्याचा थम दिल्यानंतरच या कार्डधारकाला धान्य मिळते. तथापि, जिल्ह्यातील अनेक स्वस्तधान्य दुकानदार या प्रणालीच्या वापराबाबत उदासीन आहेत. त्यामुळे शासनाच्या उद्देशाला हरताळ फासला जात असून, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रशिक्षण पूर्ण
जिल्ह्यातील सर्व स्वस्तधान्य दुकानदारांना बायोमेट्रिक मशीन वापरण्या संदर्भात आवश्यक ते प्रशिक्षण जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आले असून, सर्वच मशीनमध्ये शिधापत्रिकाधारकांची माहितीही भरण्यात आली आहे. प्रत्येक तालुकास्तरावर प्रशिक्षण प्रक्रिया तहसील प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आली. त्याशिवाय सर्वच दुकानदारांना बैठकीस बोलावून आवश्यक ते मार्गदर्शन करण्यासह बायोमेट्रिक प्रणालीच्या वापराची काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे आदेशही देण्यात आले. त्यानंतरही जिल्ह्यातील बहुतेक दुकानदार या प्रणालीच्या वापराबाबत उदासीन आहेत.
जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना बायोमेट्रिक मशीन वापरण्याचे प्रशिक्षण दिले असून, ते त्याचा वापरही करीत आहेत. तांत्रिक कारणांमुळे काही दूकनदारांनी त्याचा वापर सुरू केला नसेल, त्यांना मार्गदर्शन करून अंमलबजावणीची सूचना देऊ.
-अनिल खंडागळे, जिल्हा पुरवठा अधिकारी वाशिम