अवैध धंदे पोलिसांच्या रडारवर; १६ दिवसांत १८ आरोपींवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 02:52 PM2018-08-17T14:52:37+5:302018-08-17T14:56:04+5:30
वाशिम: पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात सुरू असलेला वरली, मटका, जुगारासह अवैध दारूविक्रीविरोधात मोहिम उघडली आहे. या अंतर्गत गेल्या १६ दिवसांत ६३ हजार ३५२ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
६० हजारांचा ऐवज जप्त:
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात सुरू असलेला वरली, मटका, जुगारासह अवैध दारूविक्रीविरोधात मोहिम उघडली आहे. या अंतर्गत गेल्या १६ दिवसांत ६३ हजार ३५२ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी १८ आरोपींविरोधातही मुंबई जुगार अॅक्ट आणि दारूबंदी कायद्यान्वये कारवाईही करण्यात आली आहे.
वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत वरली, मटका आणि जुगारासह गावठी, देशीविदेशी दारूच्या विक्रीचे अवैध धंदे जोरात सुरू करण्यात आले आहेत. यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून, या धंद्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या पृष्ठभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षकांनी सर्व अवैध धंद्यांविरोधात मोहिम उघडली आहे. या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने वरली, मटक्यासह अवैध दारूविक्रीच्या ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. या अंतर्गत १ आॅगस्ट रोजी कारजां शहरात वरली मटक्यावर छापा टाकून रोख २३,८९० रुपयांसह ३८,८९० रुपयांचा ऐवज जप्त करीत पाच आरोपीवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर ११ आॅगस्ट रोजी वाशिम शहरात सुरू असलेल्या वरली, मटक्यावर छापा टाकून रोख ४०६० रुपयांसह ८०६० रुपयांचा ऐवज जप्त करीत आरोपीवर कारवाई करण्यात आली, तर मानोरा पोलिसांच्या हद्दीत कुपटा व भोयणी येथे १३ आॅगस्ट रोजी छापा टाकून रोख ६०३० रुपयांसह ९०३० रुपयांचा ऐवज जप्त करीत ८ आरोपींवर कारवाई करण्यात आली, तसेच वाशिम मालेगाव मार्गावर वाशिम ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत एका धाब्यावर १५ आॅगस्ट रोजी ७३७२ रुपयांची देशीविदेशी दारू जप्त करीत एका आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी सुरु केलेल्या या मोहिमेमुळे अवैध धंदे करणारांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.