खासगी डॉक्टरकडून २५ लाखांचा अवैध औषधी साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:46 AM2021-05-25T04:46:42+5:302021-05-25T04:46:42+5:30
कोरोनाकाळात कोविड रुग्णालयाची परवानगी नसतानाही काही जण रुग्णांवर उपचार करीत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने ...
कोरोनाकाळात कोविड रुग्णालयाची परवानगी नसतानाही काही जण रुग्णांवर उपचार करीत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने शोधमोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत. कारंजा येथील शोएब एम. खान सिद्दिकी यांचे रौशन क्लिनिक, गवळीपुरा येथे रुग्ण कल्याण समिती समिती अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी कालिदास तापी, तालुका वैद्यकीय अधिकारी किरण जाधव, वैद्यकीय अधीक्षक भाऊसाहेब लहाने, डॉ. किरण वाघमारे, नायब तहसीलदार विलास जाधव यांच्यासह चमूतील सदस्य व पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता, दोन रुग्णांना सलाईन सुरू असल्याचे दिसून आले. पदवीबाबत विचारणा केली असता, खात्रीदायक पदवी आढळून आली नाही तसेच त्यानंतर कोणतेही नूतनीकरण न केलेले प्रमाणपत्र दाखविले. यामुळे रुग्णांना भरती करण्याचा, अॅलोपॅथिक औषधी देण्याचा, औषधाचा साठा करण्याचा अधिकार नसताना गैरकायदेशीरपणे कामकाज केल्याचे आढळून आले. काही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केल्याचेही प्रथमदर्शनी निदर्शनास आले. यावेळी स्टेरॉईड, झोपेच्या व गुंगी आणणाऱ्या गोळ्या, सलाईन यासह अन्य औषधीसाठा आढळून आला. यासंदर्भात तहसीलदार धीरज मांजरे व पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांना माहिती देताच, त्यांनी घटनास्थळ गाठून उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांना माहिती दिली. अन्न व औषध प्रशासन अधिकारी मेतक यांना कारवाईबाबत सूचना देण्यात आल्या. २५ लाख किंमतीचा औषधीसाठा जप्त केला असून, रुग्ण कल्याण समिती व अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून पुढील कार्यवाही केली जात आहे.