अवैध दारूविक्रीविरोधात धाडसत्र; तीन दिवसांत हजारोंचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 02:52 PM2018-08-03T14:52:13+5:302018-08-03T14:54:35+5:30
आसेगाव: पोलीस स्टेशन आसेगाव अंतर्गत देशी आणि हातभट्टीच्या दारूविक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या पृष्ठभूमीवर आसेगाव पोलिसांच्यावतीने धाडसत्र राबविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव: पोलीस स्टेशन आसेगाव अंतर्गत देशी आणि हातभट्टीच्या दारूविक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या पृष्ठभूमीवर आसेगाव पोलिसांच्यावतीने धाडसत्र राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विविध ठिकाणच्या हातभट्ट्यांवर छापा मारून गावठी दारूसह ६० हजार रुपयांच्यावर ऐवज जप्त करण्यात आला, तर दारूगाळपाचे साहित्यही नष्ट करण्यात आले आहे. ही मोहिम पुढेही चालविण्यात येणार आहे.
आगामी सणउत्सवाच्या पृष्ठभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विविध अवैध धंद्याविरोधात पोलीस प्रशासनाने मोहिम उघडली आहे. त्यातच आसेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून गावठी, तसेच देशी दारूच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांना वारंवार याबाबत माहिती प्राप्त होत असल्याने आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव यांनी अवैध गावठी दारूचे गाळप करून विक्री करणाºयांवर कारवाईचे सत्र सुरू केले आहे. या अंतर्गत मंगळवारी वारा जहाँगिर येथे दुचाकीवर देशी दारूच्या बाटल्या घेऊन जाणाºया युवकास पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून देशी दारूच्या बाटल्या व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर बुधवारी आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत रामगड येथे २७ हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीची गावठी दारू आणि मोह सडवा जप्त करून नष्ट करण्यात आला. पोलिसांच्या या धाडसत्रामुळे अवैध दारूची विक्री करणाºयांचे धाबे दणाणले आहे.