कडक निर्बंधातही अवैध वृक्षतोड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:40 AM2021-05-26T04:40:33+5:302021-05-26T04:40:33+5:30
पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धनावर भर दिला जात आहे, तर दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वृक्षांवर वनतस्करांकडून कुऱ्हाड ...
पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धनावर भर दिला जात आहे, तर दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वृक्षांवर वनतस्करांकडून कुऱ्हाड चालविली जात आहे. अनसिंग, तोंडगाव, काटा, तांदळी, उकळीपेन परिसरातदेखील सरकारी जमीन व शेतातील वृक्षांची कत्तल केली जात आहे. शेतकऱ्यांकडून मातीमोल भावाने वृक्ष खरेदी करायचे आणि नंतर त्याच वृक्षाची दामदुप्पट किंवा तिप्पट दराने तालुक्याच्या ठिकाणी किंवा धाब्यावर विक्री करायची, असा गोरखधंदा काही व्यापाऱ्यांनी सुरू केल्याची माहिती आहे. वृक्षतोड करण्यापूर्वी त्याबाबतची परवानगी घ्यावी लागते. सदर व्यापारी किंवा शेतकरी शासनाचा परवाना काढत नाहीत. त्यामुळे शासनाचा हजारो रुपयांचा महसूल बुडत आहे. या परिसरातील बाभूळ, कडूलिंब, बेहडे, काटशेवर, अंजन, मोहाची झाडेसुद्धा तोडली जात आहेत. शासकीय जमिनीवरील वृक्षांचीदेखील विल्हेवाट लावली जात आहे. यामुळे परिसरातील वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी वृक्षप्रेमींनी सोमवारी केली.