लॉकडाऊन काळात रुग्णवाहिकेतून अवैध प्रवासी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 10:53 AM2020-04-14T10:53:24+5:302020-04-14T10:53:41+5:30
खबरदारी म्हणून या तिघांनाही १५ दिवसांकरीता होम क्वारेंटीन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात काही रुग्णवाहिकांनी प्रवाशी वाहतुकीचा गोरखधंदा सुरू केला आहे. हा प्रकार कारंजा पोलिसांनी १२ एप्रिल रोजी कारंजा येथे उघडकीस आणला असून, चालकासह दोन महिलांविरूद्ध कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. खबरदारी म्हणून या तिघांनाही १५ दिवसांकरीता होम क्वारेंटीन करण्यात आले.
कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या प्रादुर्भावास व प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला असून संपुर्ण देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आले. तसेच अत्यावश्यक सेवा वगळून सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र रुग्णवाहिका सेवा हि अत्यावश्यक सेवेमध्ये मोडत असल्यामुळे काही रुग्णवाहिका चालक व मालक याचा गैरफायदा घेऊन रुग्णसेवेच्या नावाखाली गोरखधंदा करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कारंजा शहर पोलिसांनी १२ एप्रिल रोजी एक चालक व दोन महिलावर विविध कलमानवये गुन्हा दाखल केला आहे. 'लॉक डाऊन' असल्यामुळे शहरात पेट्रोलिंग सुरू असतांना कर्तव्यावर असणाºया पोलिसांना विनानंबरची रुग्णवाहिका दिसली. रुग्णवाहिका थांबवून अधिक विचारपूस केली असता चालकाने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यावरून पोलिसांना संशय आल्याने कसून चौकशी केली असता, रुगवाहिकेतील प्रवाशांनी सांगितले की, त्यांची मुलगी नागपूर येथे नर्सिंग महाविद्यालयात शिकत होती व लॉकडाऊन झाल्यामुळे ती तिथे अडकली असल्याने आणि वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे तिला आणण्यासाठी रुग्णवाहिकेची मदत घेतली. ते नागपूर वरून मानोरा येथे चालले होते. या प्रकरणी रुगवाहिकेतील चालकासह संबंधित दोन महिलांविरूद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारंजा शहर पोलीस स्टेशन येथे कलम १८८,२६९,२७०, भादंवि सहकलम ५५(१), आ.व्य. कायदा २००५ सहकलम १३०/१७७ मो.वा.का. प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांची तपासणी करून तिघांना १५ दिवसाकरिता होम क्वारेंटीन करण्यात आले आहे.
रुग्णवाहिकेचा व्यवसाय कारंजात फोफावला
‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणे बंधनकारक असतानाच अशी बंधने फारशी पाळली जात नसल्याचे दिसून येत आहे. जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल, याकडेच रुग्णवाहिका उपलब्ध करून देणाºयांचे लक्ष लागल्याचे अलिकडच्या काही घटनांवरून दिसून येते. शासनाने खासगी रुग्णवाहिकांसाठी कुठलीही दर निश्चिती न केल्याने काही रुग्णवाहिकेचे चालक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची लूट करत आहेत. सेवेच्या नावावर सुरू करण्यात आलेला रुग्णवाहिकेचा व्यवसाय कारंजात जोरदार फोफावला आहे. काही रुग्णवाहिका तर तीन ते चार कि.मी. अंतराचे ४०० ते ५०० रुपये घेतात. दवाखान्यातून मृतदेह न्यायचा झाल्यास आठशे ते एक हजार रुपये उकळतात.
संचारबंदीच्या काळात परजिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात येण्यास मनाई आदेश आहेत. पेट्रोलिंग सुरू असतांना कर्तव्यावर असणाºया पोलिसांना विनानंबरची रुग्णवाहिका दिसली. रुग्णवाहिका थांबवून अधिक विचारपूस केली असता प्रवाशी वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला. संबंधितांविरूद्ध कारवाई करण्यात आली.
-सतीश पाटील, ठाणेदार, कारंजा शहर पोलीस स्टेशन