शेलूबाजार येथील अवैध धंदे बंद करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:54 AM2021-06-16T04:54:27+5:302021-06-16T04:54:27+5:30
शेलुबाजार परिसरातील जिल्हा परिषदेचे सदस्य नंदाबाई बाबूलाल डोफेकर, कंझरा सर्कलच्या सुनीता पांडुरंग कोठाळे, तसेच तऱ्हाळा सर्कलचे दौलतराव रतन इंगोले ...
शेलुबाजार परिसरातील जिल्हा परिषदेचे सदस्य नंदाबाई बाबूलाल डोफेकर, कंझरा सर्कलच्या सुनीता पांडुरंग कोठाळे, तसेच तऱ्हाळा सर्कलचे दौलतराव रतन इंगोले यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे त्यांच्याकडे लेखी तक्रारीत म्हटले आहे की, कंझरा, शेलुबाजार, तऱ्हाळा जि.प. सर्कलमधील सर्व गावांत मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे बोकाळत असून त्यात पोलीस प्रशासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत ठाणेदार तसेच संबंधित पोलीस उपनिरीक्षक, जमादार यांना वारंवार सूचना करूनही अवैध उद्योगधंदे बंद होत नाहीत. त्यामुळे परिसरातील जिल्हा परिषद सदस्य यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मंगरूळपीर यांच्याकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले की, परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वरली मटका, गावरान दारू व गावातील पानटपरीवर देशी दारू, गुटखा हे व्यवसाय खुलेआम चालू आहेत. त्यामुळे गावातील जनतेला या सर्व बाबींचा त्रास होतो. तसेच गावात मोठ्या प्रमाणावर भांडणतंटे होत आहेत. कुटुंबात भांडणांचे प्रमाण वाढले असून, वरली मटका, चक्री, दारूच्या व्यसनांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, तसेच घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेत परिसरातील अवैध धंदे बंद व्हावेत यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी केडगे यांनी स्वतः लक्ष घालून सर्व अवैध उद्योगधंदे बंद करून व सुव्यवस्था राखण्याचा दृष्टीने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.