रिठद परिसरात अवैध वृक्षतोड
By admin | Published: October 29, 2014 01:25 AM2014-10-29T01:25:16+5:302014-10-29T01:25:16+5:30
वनतस्करांनी परत एकदा सक्रिय.
रिठद (वाशिम): रिठद परिसरात वनतस्करांनी परत एकदा सक्रिय होत वनसंपदेवर कुर्हाडीचे घाव घालणे सुरू केले असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यालगतच्या वृक्षांच्या फांद्या तोडल्या जात असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. पर्यावरणाचा समतोलपणा कायम राखण्यासाठी राज्यात सर्वत्रच वृक्ष लागवड व संवर्धनावर भर दिला जात आहे. यासाठी राज्य शासन लाखो रुपयांची तरतूद करीत आहे. तर दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या शासकीय व इतर प्रकारच्या वृक्षांवरच वनतस्करांकडून कुर्हाड चालविली जात आहे. रिठद परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शासकीय वृक्षांची अवैध कत्तल केली जात असल्याचे चित्र आहे. वृक्षांची कत्तल करताना नवीन शक्कल वनतस्करांकडून लढविली जात आहे. वृक्षाची साल काढून वाळविणे, वृक्षाच्या बुंध्याजवळ आग लावणे तर कधी-कधी रात्रीच्या वेळी अख्ख्या वृक्षावरच कुर्हाड चालवून त्याची परस्पर विल्हेवाट लावली जात आहे. रिठद परिसरातील शासकीय वृक्षांना कुणी वाली राहिला नसल्याची बाब समोर येत आहे. या परिसरात वनतस्कर नेहमीच सक्रिय असतात. सात-आठ महिन्यातून एक-दोन धुमाकूळ घालत उभ्या झाडांना जमीनदोस्त केले जाते. आता परत एकदा या परिसरात वृक्षांची तस्करी करणारी टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येते. वृक्षांवर कुर्हाड चालविली जात असल्याने या परिसरातील वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे दिसून येते.