रुग्णवाहिकेतून प्रवाशांची अवैध वाहतूक; प्रतिबंधात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 02:00 PM2020-03-27T14:00:57+5:302020-03-27T14:03:07+5:30
या रुग्णवाहिकेत पोलिसांना १० प्रवासी आढळून आले.
लोकमत न्युज नेटवर्क
अनसिंग : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत असताना अनसिंग परिसरात एका रुग्णवाहिकेतून अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याचा प्रकार अनसिंग पोलिसांच्या दक्षतेतुळे गुरुवार, २६ मार्च रोजी उघडकीस आला. यात १० जण प्रवास करीत असल्याचे आढळल्याने पोलिसांनी प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई केली.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा जिल्हाधिकाऱ्यांनी बंद केल्या आहेत. या आदेशाची अमलबजावणी करण्यासाठी विविध मार्गावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यात अनसिंग परिसरातही काही ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आल्या आहेत. या ठिकाणी औरंगाबादहून माहूरकडे जात असलेल्या एका रुग्णवाहिकेची पोलिसांनी दक्षतेने चौकशी केली. त्यावेळी या रुग्णवाहिकेतून अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याचे दिसून आले. या रुग्णवाहिकेत पोलिसांना १० प्रवासी आढळून आले.
पोलीस उपनिरीक्षक सरोदे, जिजाबाराव कोकणे, कॉन्स्टेबल सुनील राठोड, रोशन राठोड यांच्या चमूने या प्रकरणी लाक डाऊनच्या आदेशांतर्गत संबंधितावर कारवाई केली.
(वार्ताहर)