शेतात जाणाऱ्या ईसमास ट्रकने चिरडले; ग्रामस्थांनी रोखला राष्ट्रीय महामार्ग
By नंदकिशोर नारे | Published: January 11, 2024 02:44 PM2024-01-11T14:44:42+5:302024-01-11T14:45:24+5:30
वाशिम-हिंगोली मार्गावरील सायखेडा उड्डाणपुलानजिकची घटना
नंदकिशाेर नारे
वाशिम: वाशिमकडून हिंगोलीकडे जाणाऱ्या भरधाव आयशर ट्रकने शेतात जात असलेल्या इसमाला मागून धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवार ११ जानेवारीला सकाळी १०:३० वाजता सायखेडा येथील उड्डाण पुलानजिक घडली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी वाशिम-हिंगोली राष्ट्रीय महामार्गच रोखून धरत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
तोंडगाव येथील लक्ष्मण परशराम गोटे हे सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास सायखेडा शिवारातील शेतात जात होते. सायखेडा येथील उड्डाण पुलानजिक मागून भरधाव येत असलेल्या विना क्रमांकाच्या आयशर ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत घटनास्थळी रास्ता रोको केला.
यात डॉ. भगवानराव गोटे. जि.प. उपाध्यक्ष चक्रधर गोटे, पं.स. उपसभापती गजानन गोटे, वाशिम बाजार समितीचे संचालक दत्तराव गोटे यांच्यासह असंख्य ग्रामस्थ सहभागी झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार इंगळे व त्यांचे सहकारी, तसेच वाशिमचे तहसीलदार निलेश पळसकर, तलाठी घटनास्थळी दाखल झाले. तथापि, वृत्त लिहिस्तोवरही ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता.
वाशिम-हिंगोली राष्ट्रीय मार्गावर वाहनांची लांबलचक रांग
ट्रकने धडक दिल्याने तोंडगाव येथील लक्ष्मण गोटे यांचा जागेवरच मृत्यू झाल्याने आक्रमक झालेल्या तोंडगावच्या शेकडो ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. त्यामुळे वाशिम-हिंगोली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आणि या मार्गावर सायखेडानजिक जवळपास अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांची लांबलचक रांगच लागली होती.