स्थलांतरीत बालक, गरोदर महिलांना मिळणार पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 01:14 PM2020-06-16T13:14:22+5:302020-06-16T13:14:31+5:30

जिल्ह्यात ६ महिने ते ६ वर्षे वयोगटात २५९३ बालके असून, ५०७ गरोदर महिला स्थलांतरीत असून, ही सर्व माहिती शासनाकडे पाठविण्यात आली.

Immigrant children, pregnant women will get nutritious food | स्थलांतरीत बालक, गरोदर महिलांना मिळणार पोषण आहार

स्थलांतरीत बालक, गरोदर महिलांना मिळणार पोषण आहार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गावातून स्थलांतरीत कुटुंबातील बालकांना पोषण आहार मिळण्याचे संकेत असून, त्या दृष्टिकोनातून अंगणवाडी स्तरावर सर्वेक्षण करण्यात आले. जिल्ह्यात ६ महिने ते ६ वर्षे वयोगटात २५९३ बालके असून, ५०७ गरोदर महिला स्थलांतरीत असून, ही सर्व माहिती शासनाकडे पाठविण्यात आली, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले यांनी १५ जून रोजी दिली.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी व लॉकडाऊन आहे. रोजगारानिमित्त अनेक कुटुंब मुंबई, पुणे, नाशिक यासह महानगरात गेले होते. कोरोना विषाणू संसर्गाचे संकट लक्षात घेता महानगरात कामानिमित्त गेलेले कामगार, मजूर हे आपापल्या जिल्ह्यात परतत आहेत. त्या कुटुंबातील ६ महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची नावे अंगणवाडी केंद्रात नाहीत. त्यामुळे या बालकांना पोषण आहार मिळणे अशक्य आहे. लॉकडाऊनमुळे मजुरांना अगोदरच काम नाही, त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यातच कुटुंबातील बालकांचे कुपोषणही वाढू शकते, ही शक्यता पाहता आता या स्थलांतरीत कुटुंबातील बालकांनाही पोषण आहार मिळण्याचे संकेत असून, त्या दृष्टीने गावपातळीवर अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या माध्यमातून मे महिन्यात सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात ६ महिने ते सहा वर्ष वयोगटात २५९३ बालके असून ५०७ गरोदर महिला आहेत. या सर्वांचा अहवाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शासनाकडे पाठवून पोषण आहाराची मागणी नोंदविण्यात आली आहे.


अंगणवाडी सेविका, मदतनिसांकडून सर्वे
प्रत्येक अंगणवाडी स्तरावर दाखल झालेल्या स्थलांतरीत कुटुंबातील बालकांचे सर्वेक्षण करण्याची अंगणवाडी सेविका व मदतनीसांवर सोपविण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील सहाही ग्रामीण प्रकल्पात सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.


वरिष्ठांच्या सुचनेनुसार जिल्ह्यात अंगणवाडी स्तरावर स्थलांतरीत कुटुंबातील बालकांची व गरोदर महिलांची माहिती संकलित करण्यात आली आहे. २५९३ बालके आणि ५०७ गरोदर महिला असून, यासंदर्भातील अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे तसेच पोषण आहारासंदर्भात मागणी नोंदविण्यात आली.
-नितीन मोहुर्ले,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी

 

Web Title: Immigrant children, pregnant women will get nutritious food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम