ऑनलाईन शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 11:11 AM2020-06-22T11:11:14+5:302020-06-22T11:11:25+5:30
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन पद्धतीच्या शिक्षणावर भर देण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन पद्धतीच्या शिक्षणावर भर देण्यात येत आहे. यामुळे स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप, संगणकाचा वापर वाढला असून, आॅनलाईन वर्गात सहभाग, तासनतास एकाच ठिकाणी बसल्याने विद्यार्थ्यांच्या मान, खांदा दुखीचा तसेच डोळ्यावरही विपरित परिणाम होत असल्याचे समोर येत आहे.
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर सर्वच क्षेत्र प्रभावित झाले असून, यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे राज्यात १६ मार्चपासून शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या. कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे शाळा नेमक्या केव्हा सुरू होणार हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळे आॅनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. आॅनलाईन शिक्षणामुळे स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप, संगणकावरील स्क्रीन टाईम वाढला आहे. त्याचे विद्यार्थ्यांच्या शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचे डॉक्टरांकडे जाणाऱ्या विद्यार्थी संख्येवरून लक्षात येते. तासनतास मोबाईल, लॅपटॉप, संगणकावर बसल्याने विद्यार्थ्यांना मान, खांदा, मनगट दुखीचा तसेच डोळ्यांचा त्रास सुरू झाला आहे. आॅनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये प्रमाणापेक्षा मान खाली घातल्याने मानेच्या हाडांची झीज होऊन मानदुखीचा त्रास सुरु होतो. मानेवर ताण वाढल्याने त्याचा पाठीच्या कण्यावर परिणाम होतो. त्यामुळे सध्या मान, मणका, खांदा, मनगट दुखीच्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
डोळ्यांवरही परिणाम
आॅनलाईन शिक्षणामुळे डोळ्यावर परिणाम होत असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञांनी सांगितले. डोळ्याच्या वाढीसाठी नैसर्गीक सुर्यप्रकाश खुप आवश्यक असतो. जास्त वेळ आॅनलाईन स्क्रिन टाईम असेल तर चष्म्याचा नंबर वाढू शकतो याबरोबरच अन्य त्रासही जाणवतो. हे टाळण्यासाठी रोजचा स्क्रिन टाईम निश्चित करावा, जेवण करताना, कुटूंबातील सर्व व्यक्तींनी स्क्रिन फ्रि वेळामध्ये मोबाईल, संगणक वापरु नये. प्रत्येक २० मिनिटानंतर २० फूट दूर ठेवलेल्या वस्तुकडे २० सेकंदासाठी पाहावे. यामुळे डोळ्यांना आराम मिळेल तसेच डोळ्यांचा कोरडेपणा कमी व्हायला मदत होईल, असा सल्ला नेत्ररोग तज्ज्ञांनी दिला.
मोबाईल, संगणकावर अभ्यास करताना सतत डोळे आणि मान घालावी लागल्याने स्रायुंवर ताण वाढतो. काही तास सतत एकाच ठिकाणी बसल्याने आणि हालचाल नसल्याने मानेचा त्रास, पाठदुखी, खांदा, मनगट दुखीचे आजार मुलांना उदभवू शकतात. या लक्षणाची मुले उपचारार्थ येतात. तेव्हा शरीरावर विपरित परिणाम होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
-डॉ. विवेक साबू,
अस्थिरोग तज्ज्ञ वाशिम
जास्त वेळ आॅनलाईन ‘स्क्रिन टाईम’ असेल तर चष्मा लागू शकतो, नंबर वाढू शकतो. जास्त वेळेसाठी मोबाईल, लॅपटॉपवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे डोळ्यांना थकवा येणे, डोळे कोरडे पडणे व त्यामुळे डोळ्यांना खाज येणे, लाल होणे, डोळे दुखणे आदी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याची दक्षता घ्यावी.
-डॉ. स्वीटी गोटे,
नेत्ररोग तज्ज्ञ, वाशिम