ग्राम विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 02:46 AM2017-07-29T02:46:12+5:302017-07-29T02:46:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समिती व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या सर्व ग्राम विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना अमरावती महसूल विभागाचे आयुक्त पीयूष सिंह यांनी दिल्या. जिल्हा परिषद येथे २७ जुलै रोजी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपायुक्त झेंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी माया केदार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
विभागीय आयुक्त म्हणाले की, ग्रामीण जीवनन्नोती अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना घरांचा लाभ लवकरात लवकर दोण्याचा प्रयत्न करावा. पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेविषयी ग्रामीण भागात जनजागृती करण्यात यावी. ग्रामीण भागात स्थापन झालेल्या जास्तीत जास्त महिला बचत गटांना व्यवसायासाठी बँकेकडून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात यावा. त्यामुळे या बचत गटांना उत्पन्नाचे साधन निर्माण होण्यास मदत होईल.
स्वच्छ भारत अभियानात जिल्ह्याचे काम चांगले असून, संपूर्ण जिल्हा लवकरात लवकर हगणदरीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या. रोजगार हमी योजना, सर्व शिक्षा अभियान, अंत्योदय योजना, राजमाता जिजाऊ बाल आरोग्य व पोषण मिशन आदी योजनांचाही विभागीय आयुक्तांनी यावेळी आढावा घेतला.