वाशिम जिल्हा परिषदेत कॅबिनमुक्त कार्यालयाची अंमलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 03:25 PM2017-12-29T15:25:05+5:302017-12-29T15:25:17+5:30
वाशिम - ‘झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल’ या उपक्रमाचा एक भाग म्हणून वाशिम जिल्हा परिषदेने ‘लखिना पॅटन’ची अंमलबजावणी सुरू केली आहे. या अंतर्गत विभाग प्रमुखाची कॅबिन वगळता अन्य सर्व अधिकारी-कर्मचाºयांच्या बसण्याची व्यवस्था एका खोलीत करण्यात आली आहे.
वाशिम जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत तळमजल्यावर समाजकल्याण, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन विभाग तर पहिल्या मजल्यावर पंचायत, सामान्य प्रशासन, लेखा व वित्त, बांधकाम, आरोग्य विभाग आणि दुसºया मजल्यावर शिक्षण, कृषी, जिल्हा भूजल व अभियांत्रिकी, लघुसिंंचन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कक्ष, जिल्हा स्वच्छता कक्ष, ग्रामीण पाणीपुरवठा अशी एकूण १५ कार्यालये आहेत. प्रत्येक कार्यालयात विभाग प्रमुख, उपविभागीय अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांसाठी यापूर्वी स्वतंत्र कॅबिन होत्या तसेच कर्मचाऱ्यांसाठीदेखील बसण्याची व्यवस्था वेगवेगळी होती. यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाºयांवर नियंत्रण ठेवणे विभाग प्रमुखाला शक्य होत नव्हते.
यातून कार्यालयीन वेळेत दांडी मारणे, कामचुकारपणा, फावल्या वेळेत गप्पा रंगणे आदी प्रकार घडत होते. यावर नियंत्रण म्हणून तसेच कामकाजाला गती देण्याचा प्रयत्न म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी विभाग प्रमुख वगळता अन्य सर्वांच्या कॅबिन हटविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने निर्देशाची अंमलबजावणी करीत विभाग प्रमुख वगळता अन्य सर्व कॅबिन व बैठकीची स्वतंत्र व्यवस्था रद्द करून एकाच मोठ्या खोलीत अधिकारी व कर्मचाºयांना दोन्ही बाजूने एका सरळ रेषेत टेबल-खुर्चीची व्यवस्था केली आहे. प्रत्येक खोलीत सीसी कॅमेरे लावण्यात आले असून, नियंत्रण कक्षाची सुविधा ही मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या दालनात करण्यात आली. त्यामुळे कामचुकारांवर आपसूकच नियंत्रण बसल्याचा दावा प्रशासनाने केला.