जिल्ह्यात ‘आयरॅड ॲप’ची अंमलबजावणी गतीमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:45 AM2021-08-19T04:45:24+5:302021-08-19T04:45:24+5:30
दिवसागणिक वाढत चाललेल्या रस्ते अपघातांवर शास्त्रशुद्ध पद्धतीने नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने महामार्ग सुरक्षा पोलीस विभागाच्यावतीने ‘आयरॅड’ नावाच्या मोबाइल ॲपची निर्मिती ...
दिवसागणिक वाढत चाललेल्या रस्ते अपघातांवर शास्त्रशुद्ध पद्धतीने नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने महामार्ग सुरक्षा पोलीस विभागाच्यावतीने ‘आयरॅड’ नावाच्या मोबाइल ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. अंमलबजावणीत पोलीस, परिवहन, आरोग्य आणि रस्ते महामार्ग विभागाची प्रमुख जबाबदारी राहणार आहे. जिल्ह्यात जिल्हा वाहतूक शाखेचे विजय पाटकर यांच्याकडे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात कुठेही अपघात झाल्यास प्रशिक्षित पोलीस अधिकारी तेथे तात्काळ पोहचत आहेत. तसेच अपघातांची ‘आयरॅड ॲप’मध्ये नोंद करीत आहेत. जर अपघात खड्ड्यांमुळे झाला असेल, तर बांधकाम विभागाकडे ‘ॲप’द्वारे सूचित करण्यात येत आहे. वाहतूक नियम न पाळल्याने अपघात झाल्यास तशी नोंद करून अहवाल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येत आहे. अलिकडच्या काळात अशा ६२ अपघातांच्या नोंदी ‘आयरॅड ॲप’वर वाहतूक पोलिसांनी घेतल्याची माहिती विजय पाटकर यांनी दिली.
.....................
तीनवेळा झाले प्रशिक्षण शिबिर
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील १३ अधिकारी आणि ५२ कर्मचाऱ्यांना ‘आयरॅड ॲप’ हाताळण्यासंबंधी तीनवेळा प्रशिक्षण देण्यात आले आहे. ‘ॲप’मध्ये अपघाताची संपूर्ण माहिती, त्यासंबधीचा अहवाल अंतर्भूत केला जात आहे. अहवालाची जोडणी थेट ‘सीसीटीएनएस’ आणि ‘ऑनलाइन एफआयआर’शी केली जात आहे. त्यामुळे येत्या काळात रस्ते अपघातांची संख्या कमी होण्यासाठी तत्काळ उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
.....................
कोट :
जिल्ह्यात वाशिम आणि कारंजात शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन कार्यान्वित आहे. याशिवाय इतर ठिकाणी ९ पोलीस स्टेशन आहेत. काही ठाण्यांमध्ये ‘आयरॅड ॲप’ची रंगीत तालीम झाली. जिल्ह्यात कुठेही अपघात घडल्यास त्याची संपूर्ण माहिती संकलित करून ‘ॲप’मध्ये नोंद घेतली जात आहे. पुढील काळात या कामाला आणखी गती दिली जाणार आहे.
- विजय पाटकर
नोडल अधिकारी, आयआरएडी, प्रकल्प