‘लेक शिकवा’ अभियानाची अंमलबजावणी तकलादू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 03:19 PM2019-01-14T15:19:48+5:302019-01-14T15:20:16+5:30
वाशिम: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून यंदा सलग तिसऱ्या वर्षी सर्व शाळांमधून महिनाभर ‘लेक शिकवा’ अभियान राबविण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिले होते. मात्र, शिक्षण विभागाच्या उदासिनतेमुळे या अभियानाची अंमलबजावणी बहुतांशी तकलादू ठरत असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून यंदा सलग तिसऱ्या वर्षी सर्व शाळांमधून महिनाभर ‘लेक शिकवा’ अभियान राबविण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिले होते. मात्र, शिक्षण विभागाच्या उदासिनतेमुळे या अभियानाची अंमलबजावणी बहुतांशी तकलादू ठरत असल्याचे दिसून येत आहे.
मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यात शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने ३ जानेवारीपासून २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनापर्यंत राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील शाळांमध्ये ‘लेक शिकवा’ या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने संबंधित सर्व शिक्षणाधिकाºयांना दिल्या होत्या. त्यानुषंगाने विद्या प्राधिकरणाने ३ ते २६ जानेवारीदरम्यान शाळांमध्ये राबवावयाचा कृती कार्यक्रमही जाहीर केला. याअंतर्गत ३ जानेवारीला पथनाट्य, प्रभातफेरीच्या माध्यमातून मुलींमध्ये शिक्षणविषयक आवड निर्माण करणे व पालकांमध्ये जनजागृती करणे, ४ जानेवारीला मुलींच्या आई-वडिलांचा सत्कार, कर्तुत्ववान महिलांच्या मुलाखती घेणे, ५ जानेवारी विविध स्पर्धांचे आयोजन करणे, ८ जानेवारीला व्यावसायिक मार्गदर्शन, ९ जानेवारीला मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत व्यक्ती व संस्थांचा सन्मान, १० जानेवारीला महिला सक्षमीकरणावर प्रश्नमंजुषा, १२ जानेवारीला जनजागृतीपर विविध कार्यक्रम; तर त्यापुढे २६ जानेवारीपर्यंत ‘गुड टच- बॅड टच’ यासह अन्य स्वरूपातील महत्वाची माहिती मुलींना देण्याचे निर्देश शिक्षणाधिकाºयांना देण्यात आले होते. मात्र, शाळांमध्ये या महत्वाकांक्षी उपक्रमाची विशेष अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे ‘लेक शिकवा’ हे अभियान बहुतांशी तकलादू ठरत असल्याचे दिसून येत आहे.
वाशिम जिल्ह्यातील शाळांमध्ये ‘लेक शिकवा’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना यापुर्वीच देण्यात आलेल्या आहेत. त्याचा आढावा सर्व शाळांकडून घेण्यात येईल.
- टी.ए. नरळे,
माध्यमिक शिक्षणाधिकारी, वाशिम