रब्बीत गहू, हरभरा खाणार भाव; करडई पिकालाही राहणार पसंती!
By संतोष वानखडे | Published: October 11, 2023 05:15 PM2023-10-11T17:15:50+5:302023-10-11T17:16:09+5:30
कृषी विभागाचे पीक पेरणी नियोजन : पेरणीयोग्य १.१५ लाख हेक्टर क्षेत्र
वाशिम : यंदाच्या खरीप हंगामात निराशा झाल्यानंतर शेतकऱ्यांचे लक्ष आता रब्बी हंगामाकडे लागून आहे. रब्बी हंगामात यंदाही गहू, हरभऱ्यालाच सर्वाधिक पसंती राहणार असून, कृषी विभागाने त्यादृष्टीने १.१५ लाख हेक्टरवर नियोजन केले आहे.
यंदा मान्सूनचे विलंबाने आगमन झाल्याने खरीप हंगामात पेरण्याही उशिराने झाल्या होत्या. त्यानंतर पावसात सातत्य नसल्याने तसेच पिवळा मोझॅक व अन्य रोगराईमुळे सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप हंगामाने निराशा केल्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त रब्बी हंगामातील पिकांवर आहे. परतीचा पाऊसही पाठ फिरवित असल्याने रब्बीत पिकांच्या सिंचनासाठी प्रकल्पांतून पुरेसे पाणी मिळणार की नाही? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी एक लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी होते.
यंदा १ लाख १५ हजार ७७० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक ७५ हजार हेक्टरच्या आसपास हरभरा पेरणीचा अंदाज वर्तविला आहे . सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी गव्हाच्या पेरणीला प्राधान्य देतात. ३५ हजार हेक्टरच्या आसपास गव्हाची पेरणी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. कोरडवाहू पीक म्हणून ओळख असलेल्या करडईकडेही काही शेतकरी वळण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. याशिवाय मसूर, राजमा, सूर्यफूल, मोहरी या पिकांची पेरणी होण्याचा अंदाज आहे. मात्र, या पिकांखालील क्षेत्रफळ अत्यल्प राहिल, असे सांगण्यात येते.
असे आहे रब्बी पीक पेरणीचे नियोजन (हेक्टर)
पीक / नियोजन
गहू / ३५०००
हरभरा / ७५०००
ज्वारी / १८००
करडई / १५००
इतर तृणधान्य / ५००
इतर कडधान्य / १५००
इतर गळीतधान्य / ३५०