महत्वाचे दस्तावेज ऑनलाईन, जिल्हाधिकारी सन्मानित; लोकसेवा हक्क कायदा
By संतोष वानखडे | Published: April 19, 2023 01:28 PM2023-04-19T13:28:32+5:302023-04-19T13:29:39+5:30
आयुक्ताकडून दखल
वाशिम: सातबारा, गाव नमुना ८-अ, कोतवाल बुकाची नक्कल, फेरफार व हक्क नोंदणी नक्कल इत्यादी दस्ताऐवज तत्परतेने ऑनलाईन उपलब्ध करुन दिल्याबद्दल राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या अमरावती विभागाचे आयुक्त डॉ. एन. रामबाबू यांच्या हस्ते जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
कोतवाल बुकाची नक्कल हा एक महत्वाचा जुना दस्ताऐवज स्कॅनिंग करुन ई-कोतवाल बुक प्रणाली विकसीत करुन सन २०२२-२३ या वर्षात शण्मुगराजन एस. यांनी जिल्हयात कार्यान्वीत केली. तसेच जिल्हयातील सर्वच तालुक्याच्या ठिकाणी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्यालयामध्ये अशा एकूण १४ ठिकाणी एटीडीएम मशिन स्थापित केल्या. या मशिनच्या माध्यमातून नागरीकांना सातबारा, गाव नमुना ८-अ, फेरफार व हक्क नोंदणी नक्कल इत्यादी दस्ताऐवज तत्परतेने ऑनलाईन उपलब्ध करुन दिल्याबद्दल हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ची जिल्हयात प्रभावी अंमलबजावणी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केली. या उपक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे व राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्राचे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सागर हवालदार यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचा सुध्दा आयुक्त डॉ. रामबाबू यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी उपसचिव अनिल खंडारे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक अभिनव बालुरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांचेसह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.