ई-केवायसीत राज्यात वाशिम जिल्हा अव्वल तर भंडारा दुसऱ्या क्रमांकावर
By संतोष वानखडे | Published: September 8, 2022 06:07 PM2022-09-08T18:07:10+5:302022-09-08T18:08:24+5:30
ई-केवायसी करण्याच्या प्रक्रियेत वाशिम जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.
वाशिम: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत ई-केवायसी करण्याच्या प्रक्रियेत वाशिम जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर असून, दुसऱ्या क्रमांकावर भंडारा व तिसऱ्या क्रमांकावर नाशिक जिल्हा आहे. देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून घेतला. १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना संपूर्ण देशभर लागू केली आहे. दर चार महिन्यांनी या योजनेचा २ हजार रुपयांचा हप्ता योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येतो.
मात्र केंद्र शासनाने या योजनेबाबत निर्णय घेऊन यापुढील हप्त्यांच्या संबंधित शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक केले आहे. पुढील हप्त्यांच्या लाभापासून जिल्ह्यातील पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी ई-केवायसी करण्याच्या जिल्हाधिकारी शण्मुगराजन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार ३५१ शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया ८ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली आहे. आता केवळ २५ हजार २४ शेतकऱ्यांची ई-केवायसी करणे बाकी आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेत ई-केवायसी करण्याच्या प्रक्रियेत वाशिम जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.
व्यापक प्रमाणात जनजागृती
वाशिम जिल्ह्यात या योजनेसाठी पात्र असलेल्या १ लाख ८९ हजार ३७५ लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. १८ ऑगस्टपर्यंत ७० हजार ८६७ शेतकरी ई-केवायसी करण्यापासून दूर होते. त्यानंतर जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस यांनी पुढाकार घेत ई-केवायसीबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. त्यानुसार जनजागृती झाल्याने जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार ३५१ शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली.