दीड वर्षांत शेतीसाठी दिवसाही वीज मिळणार; सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत १७५ मेगावॅट होणार वीजनिर्मिती

By दिनेश पठाडे | Published: November 29, 2023 07:06 PM2023-11-29T19:06:39+5:302023-11-29T19:06:48+5:30

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी १७५ मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे निविदा प्रसिद्ध झाले आहे.

In one and a half years, electricity will be available for agriculture even during the day 175 MW of electricity will be generated under Solar Agriculture Channel Scheme |  दीड वर्षांत शेतीसाठी दिवसाही वीज मिळणार; सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत १७५ मेगावॅट होणार वीजनिर्मिती

 दीड वर्षांत शेतीसाठी दिवसाही वीज मिळणार; सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत १७५ मेगावॅट होणार वीजनिर्मिती

वाशिम: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी १७५ मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे निविदा प्रसिद्ध झाले आहे. पुढील अठरा महिन्यात त्याचे काम पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील ९२ टक्के शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा नियमित वीज पुरवठा होईल, अशी माहिती एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी बुधवारी दिली.

२९ नोव्हेंबरला जिल्हा नियोजन भवनात महावितरण, महापारेषण, महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभागाच्या जिल्हा आढावा बैठक पार पडली. यवेळी एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक आशिष चंदाराणा, महावितरणचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यावेळी उपस्थित होते. विश्वास पाठक म्हणाले की, शेतकऱ्यांना सध्या सिंचनासाठी दिवसा आणि रात्री पाणीपुरवठा होतो. परंतु केवळ दिवसा नियमित पाणीपुरवठा करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यासाठी राज्य शासनाने सौर ऊर्जेचा वापर करून सात हजार मेगावॅट वीजनिर्मिती करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हाती घेतली आहे. त्यापैकी साडेतीन हजार मेगावॅट वीजनिर्मितीची टेंडर प्रसिद्ध झाली आहेत. त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील १७५ मेगावॅट वीजनिर्मितीचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतीसंबंधी ३८ उपकेंद्रांना वीज पुरवठा होणार असून जिल्ह्यातील ९२ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्याचा लाभ होईल. ही कामे अठरा महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले. आशिष चंदाराणा म्हणाले की, नवीन विद्युत जोडणी देताना ग्राहकांना गरजेपुरतीच कागदपत्रे मागावीत. वाशिम जिल्ह्यातील तूट अधिक असलेल्या फीडर्सवर लक्ष केंद्रित करून तेथे वीजबिल वसुलीवर अधिक भर द्यावा.
 
आरडीएसएस अंतर्गत ७५७ कोटींची कामे
वाढती मागणी ध्यानात घेता वीज वितरण जाळे मजबूत करण्यासाठी आरडीएसएस ही महत्त्वाची योजना अंमलात आणली जात आहे. त्यामध्ये वाशिम जिल्ह्यात ७५७ कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची कामे होणार आहेत. नवीन वीज उपकेंद्रे उभारणे, ट्रान्सफॉर्मर्सची संख्या वाढविणे, स्मार्ट मीटर बसविणे, विद्युत वितरण प्रणाली सुधारणे अशी कामे हाती घेण्यात आली आहेत.
 

Web Title: In one and a half years, electricity will be available for agriculture even during the day 175 MW of electricity will be generated under Solar Agriculture Channel Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम