दोन महिन्यांत ३१७० बालके कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर! विशेष मोहिमेचा सकारात्मक परिणाम
By संतोष वानखडे | Published: April 11, 2024 04:47 PM2024-04-11T16:47:51+5:302024-04-11T16:49:03+5:30
वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी येणाऱ्या स्वातंत्र्य दिनापूर्वी वाशिम जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प १६ फेब्रुवारी २०२४ रोजी केला होता.
वाशिम : स्वातंत्र्यदिनापूर्वी वाशिम जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषद प्रशासनाने सोडला असून, त्याअनुषंगाने कृती आराखडा तयार करण्यात आला. दोन महिन्यातच ३१७० बालके कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर आल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नाला यश आल्याचे पाहावयास मिळत आहे.
योग्य प्रमाणात अन्न-पोषकद्रव्ये असलेल्या सकस अन्नाच्या अभावामुळे बालके कुपोषणास बळी पडतात. वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी येणाऱ्या स्वातंत्र्य दिनापूर्वी वाशिम जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प १६ फेब्रुवारी २०२४ रोजी केला होता. त्यावेळी जिल्ह्यात सर्व प्रकारातील कुपोषित बालकांची संख्या १३५१५ होती. कुपोषणाच्या श्रेणीतून या बालकांना बाहेर काढण्यासाठी कृती आराखडा ठरविण्यात आला. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना तालुक्याचे पालकत्व देण्यात आले. मागील दोन महिन्यांत मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांघिक प्रयत्न केल्याने ३१७० कुपोषित बालके कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर आली आहेत. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्ह्यात सर्व प्रकारातील कुपोषित बालकांची संख्या १३५१५ होती. १० एप्रिल २०२४ रोजी ही संख्या १०३१५ पर्यंत खाली आली.
कुपोषणमुक्तीसाठी मालेगाव आघाडीवर...
मालेगाव तालुक्याचे पालक अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे, सहपालक अधिकारी तथा कृषी विकास अधिकारी गणेश गिरी आणि मालेगावचे गटविकास अधिकारी बाळकृष्ण अवगण, बालविकास प्रकल्प अधिकारी सारिका देशमुख, विस्तार अधिकारी मदन नायक यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनिस व आशा स्वयंसेविकांनी कुपोषित बालकांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले. अंगणवाडी सेविकांना पौष्टिक पाककृतीचे प्रशिक्षण देऊन कुपोषित बालकांच्या घरी भेटी दिल्या. कुपोषणाच्या चारही श्रेणीतील बालकांचे वजन वाढीसाठी विशेष उपाययोजनांची अंमलबजावणी केली. त्यामुळे कुपोषित बालकांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढण्यात मालेगाव तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे.